विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत अध्यक्ष निर्णय घेतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली भूमिका

विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांची संख्या कमी असली तरी त्यांच्या संख्येवरून आम्ही त्यांचा आवाज मोजणार नाही, विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे किंवा कसे याबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता द्यायचा ठरवला तर त्याला आमचा विरोध राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्ष्ट केले.

मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूर अधिवेशनापूर्वी होईल. महायुतीत खातेवाटप जवळपास निश्चित झाले आहे. काही खात्यांवर चर्चा सुरू आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांकडे असलेल्या खात्यात फार नाही, पण थोडे बदल होतील. मंत्रिमंडळात मंत्र्यांचा समावेश करताना त्यांच्या कामाचे मूल्यांकन केले जाईल असे फडणवीस म्हणाले.

9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड

विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी मुंबईत विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून तशी शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होईल असे फडणवीस म्हणाले.

जातनिहाय जनगणनेला विरोध नाही

जातनिहाय जनगणना करण्यास आपला विरोध नाही. बिहारमध्ये  जातनिहाय जनगणना करण्यास आम्ही पाठिंबा दिला होता. मात्र जातनिहाय जनगणनेचे कुणी हत्यार बनवू नये. त्यामुळे छोटा समाज, मायक्रो ओबीसी यांच्यावर अन्याय होऊ शकतो, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.