श्वानांना मारहाण करणाऱ्या पेट केअर सेंटरला सील ठोका, एसपीसीएने बजावली नोटीस

येऊरच्या पेट केअर सेंटरमध्ये दोन निष्पाप पाळीव श्वानांना मारहाण करण्यात आल्यानंतर सेंटरला सील ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची दखल पेटा इंडिया संस्थेने घेतल्यानंतर सेंटर बंद करण्याची नोटीस एसपीसीएने या डॉग केअर सेंटरला बजावली आहे. काही दिवसांपूर्वी सेंटरमध्ये कुत्र्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी एका श्वानाच्या डोळ्याला इजा झाल्याने त्याची दृष्टी कमकुवत झाली तर दुसऱ्या श्वानाला जबर दुखापत झाली होती. आता एसपीसीएने बजावलेल्या नोटिसीमुळे पेट केअर सेंटर चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ठाण्यात राहणारे अभिषेक कुमार यांना आपल्या कुटुंबासह बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी आपल्या आठ महिन्यांचा डॉलर आणि दीड वर्षांचा विस्की या दोन श्वानांना येऊरमधील डॉग अॅण्ड पेट केअर सेंटरमध्ये 27 डिसेंबर रोजी ठेवले. काही दिवसांत पुन्हा ठाण्यात आल्यानंतर कुमार कुटुंबीय श्वानांना घेण्यासाठी गेले असता सेंटरमध्ये श्वानांना मारहाण झाली असल्याचे लक्षात आले. या मारहाणीमध्ये डॉलरच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. विस्की या श्वानाला एवढी मारहाण झाली आहे की त्याला शरीराच्या आतल्या बाजूला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती.

अन् पायाखालची वाळू सरकली

श्वानांना दुखापत झाल्याने सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. सीसीटीव्ही फुटेज मिळाले तेव्हा कुमार कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. आपल्या श्वानांना जबर मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पेटा इंडियाने डॉग सेंटर बंद करण्यासाठी सोसायटी प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स (एसपीसीए) यांनी पाठपुरावा करून सेंटर बंद करण्याची नोटीस दिली आहे.