नदालच्या कारकीर्दीचा पराभवाने शेवट

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या टेनिस कारकीर्दीचा शेवट पराभवाने झाला. तो आपल्या अखेरच्या सामन्यात जगातील 80 व्या क्रमांकाच्या बोटिच वान डे झॅण्डस्कल्पविरुद्ध 6-4, 6-4 असा सहज पराभूत झाला. यासह डेव्हिस चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतही स्पेनचा नेदरलॅण्ड्सकडून पराभव झाला. 22 ग्रँडस्लॅम विजेता नदाल दोन दशकांहून अधिक काळ टेनिस खेळला. नेदरलॅण्ड्सने स्पेनला 2-1 असे पराभूत केले. चाहते ‘राफा, राफा, राफा‘ असे ओरडत होते. नदालच्या संस्मरणीय कारकीर्दीसाठी सेंटर कोर्टवर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कारकीर्दीतील संस्मरणीय क्षणांची साक्ष देणारा व्हिडीओ दाखवताच नदालचे डोळे अश्रूंनी डबडबले. कार्लोस अल्काराझने दुसऱया एकेरी सामन्यात टालोन ग्रीकस्पूरला 7-6, 6-3 असे पराभूत केले. अल्काराझ आणि मार्शेल ग्रानोलेर्स जोडी दुहेरीत 6-7, 6-7 अशी पराभूत झाली. नेदरलॅण्ड्सचा सामना आता जर्मनी किंवा कॅनडाशी होईल.

 

हा कारकीर्दीतील नकोसा क्षण ः नदाल

कारकीर्दीत प्रत्येकाला हा क्षण नकोसा असतो. मी टेनिस खेळून थकलेलो नाहीय, पण माझे शरीर आता विश्रांती मागतेय आणि मला ती स्वीकारावी लागतेय. माझ्या छंदाचे करिअरमध्ये रूपांतर करू शकलो आणि अपेक्षेपेक्षा जास्त काळ खेळू शकलो त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या सर्वांचा मी सदैव ऋणी राहीन.