Spain’s King Mud Attack : ‘किलर, शेम ऑन यू’, स्पेनच्या राजा-राणीवर चिखलफेक! महापूर रोखण्यात अपयश आल्याने लोकांचा संताप अनावर

महापूर रोखण्यात सपशेल अपयश आल्याने संतापलेल्या लोकांनी स्पेनचे राजे फिलिप आणि त्यांच्या पत्नी राणी लेटिजिया तसेच पंतप्रधान पेड्रो सान्चेझ यांच्यावर चिखलफेक केली. यावेळी जमावाने ‘किलर, शेम ऑन यू’ अशा घोषणाही दिल्या.

दोन दिवसांपूर्वी स्पेनमध्ये वर्षभराचा पाऊस केवळ आठ तासातच बरसला. तब्बल १२ इंचापेक्षा जास्त पाऊस झाल्याने स्पेनमधील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांच्या नद्या झाल्याने शेकडो चारचाकी वाहून गेल्या. अगणित घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने दाणादाण उडाली. महापूर रोखता येणे शक्य असतानाही सरकार ढिम्म होते. पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काहीच उपाय करण्यात आले नाहीत. त्यामुळे स्पॅनिश जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे.

व्हॅलेन्सिया भागात पुराची पाहणी करण्यासाठी गेलेले राजे फिलिप, राणी लेटेजिया आणि पंतप्रधान पेड्रो सान्चेझ यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी जमावातील काही जणांनी चिखलफेक केली. यात राजांचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले. राजे फिलिप यांचा ताफा माघारी फिरत असताना त्यांच्या गाडीवरही चिखलाचे गोळे फेकण्यात आले.

राजे फिलिप यांनी व्हॅलेन्सियाला भेट देण्याचा निर्णय अतिशय वाईट होता, असे खासदार जुआन बॉर्डेरा म्हणाले. अधिकार्‍यांनी त्यांना लोकांमध्ये असलेल्या रोषाची कल्पना दिली होती. परंतु फिलिप यांनी रोष झुगारून भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना चिखलफेकीला सामोरे जावे लागले, असे बॉर्डेरा यांनी सांगितले.