स्पेनमध्ये अवघ्या 8 तासांत तब्बल वर्षभराचा पाऊस झाला असून मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात रस्ते आणि पूल अक्षरशः वाहून गेल्याचे चित्र आहे. जिकडेतिकडे हाहाकार माजला असून मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या पावसाने गेल्या 50 वर्षांचा रेकॉर्ड मोडला असून महापुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा तब्बल 205 वर गेला आहे. यातील 202 जण एकट्या व्हॅलेन्सिया शहरातील आहेत. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
नुकसानग्रस्त वाहने, कचरा आणि चिखलाचे साम्राज्य शहरातील अनेक रस्त्यांवर एकमेकांवर आदळलेली वाहने आणि कचरा, चिखल तसेच कोसळलेल्या घरांचे ढिगारे दिसत आहेत. अनेक ठिकाणी रहिवाशी घरांमध्ये अडकून पडले असून वीजपुरवठा नाही, पिण्याचे पाणी नाही तसेच घरातील टेलिफोनचे कनेक्शनही बंद आहे. मोबाईल फोनला रेंज नाही, अशी भयंकर स्थिती अनेक ठिकाणी दिसत आहे.
दरम्यान, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर जलप्रवाहात अडकलेल्या वाहनचालकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी नौकांचा वापर करण्यात येत आहे.