एक देश एक निवडणुकीच्या आडून लोकशाही संपवण्याचा कट, अखिलेश यादव यांचा आरोप

एक देश एक निवडणूक ही व्यवस्था लोकशाहीच्या विरोधात आहे अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी केली आहे. तसेच एक देश एक निवडणुकीच्या आडून लोकशाही संपवण्याचा कट रचला जात आहे असेही यादव म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून अखिलेश यादव म्हणाले की, एक देश एक निवडणूक ही व्यवस्था फक्त व्यावहारिक नसून लोकशाहीच्या विरोधातही आहे. कारण काही राज्य सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच अस्थिर होतात. मग याचा अर्थ असा आहे का की त्या राज्यातली जनता लोकशाहीने निवडून आलेल्या प्रतिनधींशिवाय राहतील? एक देश एक निवडणुकीसाठी संविधानानुसार निवडून आलेली सरकारे भंग करावी लागतील आणि हा जनमताचा अपमान होईल.

तसेच खरंतर एक देश एक निवडणूकी ही लोकशाहीविरोधात रचलेलं षडयंत्र आहे. एकाचवेळी संपूर्ण देशावर ताबा मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. यामुळे निवडणूक ही फक्त दाखवण्याची प्रक्रिया राहिल. जे सरकार पाऊस,पाणी आणि सण-उत्सवांचे बहाणे देऊन निवडणुका टाळत असेल ते सरकार एकाचवेळी निवडणुकी घेण्याचे दावे कसे करू शकतात?

एक देश एक निवडणूक ही बहाणा आहे, याच्या आडून देशात एकाधिकारशाही आणून लोकशाही संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक देश एक निवडणूक म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे अपहरण करण्याचा कट आहे असा आरोपही यादव यांनी केला आहे.