शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित स.प. महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानाचा वापर विद्यार्थ्यांसाठी कमी आणि राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी जास्त होत आहे. यातून बक्कळ भाडे मिळत असल्याने संस्थेलाही विद्यार्थ्यांचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. भाडेतत्त्वावरील कार्यक्रमांची नेहमीच मांदियाळी असलेल्या या मैदानावर आता केवळ ‘शुभमंगल’ सोहळ्याचा बॅण्ड-बाजा वाजायचाच बाकी राहिलाय! संस्थेच्या या ‘भाडेप्रेमा ‘पोटी महाविद्यालयीन विद्यार्थी मात्र क्रीडा-कलागुणांपासून वंचित राहत असल्याची खंत पालकांसह पुणेकरांतून व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून सर परशुराम महाविद्यालयाचे मैदान विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी वापरले जाण्याची जणू प्रथाच पडली आहे. धार्मिक कार्यक्रम असो वा पुरस्कार वितरण सोहळे असो इथेच होतात. विशेष म्हणजे बाकीच्या राजकीय पक्षांना मैदान नाकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा देखील इथे भरतात. मागील वर्षभरात या मैदानावर अंदाजे २० पेक्षा जास्त कार्यक्रम भरवण्यात आले. त्यातील काही कार्यक्रम हे सलग 4 ते 5 दिवस चालणारे होते. अगदी एक दिवसाचा कार्यक्रम भरावयाचे झाले तरी त्याची तयारी आठवडाभर आधीच चालू होते. त्यासाठी मैदानावर भले मोठे शाही मांडव उभारण्यात येतात. वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येते. कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी विशेष सोय करण्यात येते. या सर्वांतून फक्त कार्यक्रमाच्या एका दिवसासाठी सजविण्यात आलेले मैदान कायमस्वरूपी विद्रुप करणात येते. विशेष म्हणजे काही कार्यक्रमांच्या दिवशी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येते सध्या येथे शि. प्र. मंडळी संस्थेच्या शाळांचे क्रीडा महोत्सव चालू आहे. त्यासाठी तेथील मुलांना एखाद्या कोपऱ्यात नेले जाते.
मैदानावर भाडेतत्वावर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी मांडव उभारणी केली जाते. या मांडवाचे साहित्य मोठ्या ट्रकमधून मैदानावर आणले जाते. मंडप तसेच इतर कामासाठी अनेकदा जेसीबीचाही वापर केला जातो. एकूणच इथे येणाऱ्या या अवजड वाहनांमुळे रोज शाळा भरतांना व सुटतांना विद्यार्थी व पालक यांना जिव मुठीत घेवून ये जा करावी लागते. कार्यक्रम झाल्यावर विद्यार्थ्यांना मैदानात पडलेला कचरा, खिळे, लोखंडी साहित्य यांच्याशी सामना करावा लागतो.