![bus accident](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/bus-accident-696x447.jpg)
प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील बस ट्रेलरला धडकताच आग लागली आणि या आगीमध्ये होरपळून 41 जणांचा जागीच कोळसा झाला आहे. यात बसच्या दोन ड्रायव्हरचाही समावेश आहे. मेक्सिकोमध्ये शनिवारी हा अपघात झाल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.
वृत्तानुसार, 48 प्रवाशांना घेऊन एक लक्झरी बस केनकनहून टॅबस्कोच्या दिशेने निघाली होती. भरधाव वेगातील बस ट्रेलरला धडकली आणि यानंतर बसला आग लागली. एस्कास्सेगा शहराजवळ झालेल्या अपघातात बसमधील दोन ड्रायव्हरस 41 प्रवाशांचा मृत्यू झाला. कोमाल्काल्कोचे महापौर ओविडियो पेराल्टा यांनी अपघाताची पुष्टी करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमधील काही प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
ही बस टूर अकोस्टा कंपनीची होती. पर्यटकांना घेऊन ही बस मार्गस्थ झाली होती. बसमध्ये एकूण 48 लोक होते. यातील बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाला असून टूर अकोस्टाने यावर शोक व्यक्त करत अपघाताच्या कारणांचा तपास करणार असल्याची माहिती दिली.
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर क्षणभरात बसने पेट घेतला. लक्झरी बस असल्याने खिडक्याही बंद होत्या आणि त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. आगीमुळे बस वितळू लागली, आतल्या सीट जळून खाक झाल्या. प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या मात्र आगीत प्रवेश करून त्यांना वाचवण्याची कुणाची हिंमत झाली नाही.