टॉलीवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 650 कोटींची कमाई केलेला रजनीकांत यांच्या ‘कबाली’ सिनेमाच्या निर्मात्याने आत्महत्या केली आहे. सोमवारी उत्तर गोव्यातील एका गावात भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. या बातमीने मनोरंजन सृष्टीला धक्का बसला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
गोव्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केपी चौधरी (44) म्हणजेच शंकरा कृष्ण प्रसाद चौधरी असे त्यांचे नाव असून त्यांचा मृतदेह सिओलीम गावात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. अंजुना पोलीस ठाण्याच्या सिओलीम चौकीला घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमने केपी यांना 2023 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यानंतर ते नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे.
रजनीकांत यांचा सुपरहिट सिनेमा ‘कबाली’ 2016 मध्ये रिलीज झाला होता, ज्याची निर्मिती केपी चौधरी यांनी केली होती. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सिनेमाने तेव्हा जगभरात 650 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि त्यावर्षी तामिळ सिनेमाच्या सर्वात मोठ्या सिनेमांच्या यादीत तो टॉपवर होता.