विष्ठा अन् कचऱ्यानं भरलेले फुगे; उत्तर आणि दक्षिण कोरियात पुन्हा ‘बलून’ वॉर

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये कायम तणावाची स्थिती असते. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम-जोंग-उन कायमच दक्षिण कोरियावर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी देतो. ही धमकी त्याने खरीही करून दाखवली होती. किम-जोंग-उनच्या डोक्यात काही वर्षांपूर्वी ‘पू वॉरफेअर’ची कल्पना आली होती आणि दोन्ही देशांमध्ये ‘बलून वॉर’ सुरू झाले होते. मधल्या काळात हे वॉर थांबले होते, मात्र आता पुन्हा उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये ‘बलून वॉर’ सुरू झाले आहे.

दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगविरोधात दुष्प्रचार सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने पुन्हा एकदा ‘बलून वॉर’ सुरू केले. उत्तर कोरियाने रविवारी (21 जुलै) विष्ठा आणि कचरा भरलेले फुगे दक्षिण कोरियाच्या बाजूला सोडले. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. उत्तर कोरियाने सोडलेल्या फुग्यांना प्रत्युत्तर देण्याची दक्षिण कोरियाने तयारी केली आहे.

याआधी 2023मध्येही ‘बलून वॉर’ सुरू झाले होते. त्यावेळी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम -जोंग -उन याने त्याला ‘पू वॉरफेअर’ असे नाव दिले होते. दोन्ही बाजूने एकमेकांच्या देशावर ‘विष्ठा आणि कचरा’ भरलेल्य़ा फुग्यांनी हल्ला चढवला होता.

राजधानी सियोलच्या उत्तरकडील भागामध्ये उत्तर कोरियाने सोडलेले फुगे आढळून आले. आकाशात फुग्यासोबत दिसणाऱ्या वस्तुंपासून लांब रहा आणि जमिनीवर असा फुगा आढळल्यास पोलीस किंवा सैन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे आवाहन दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ यांनी केले आहे.

दरम्यान, मे महिन्याच्या शेवटीही दोन्ही देशांमध्ये ‘बलून वॉर’ रंगले होते. त्यावेळी उत्तर कोरियाने कपड्यांचे तुकडे, सिगारेटचे तुकडे, खराब झालेल्या बॅटरी, राजकीय पत्रकं दक्षिण कोरियाच्या बाजूने फुग्याद्वारे सोडली होती. अर्थात यामुळे दक्षिण कोरियातील नागरिकांना कोणतीही हानी झाली नाही. मात्र दोन्ही देशातील तणाव मात्र वाढला होता. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.