South Korea सरावादरम्यान लढाऊ विमानातून अचानक बॉम्ब सुटले, 7 नागरिक जखमी

दक्षिण कोरियाच्या लष्करी विमानांनी गुरुवारी चुकून फायरिंग रेंजच्या बाहेर बॉम्ब डागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

योनहाप न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण कोरियाच्या केएफ-16 विमानाने उत्तर कोरियाच्या सीमेपासून 25 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या पोचेओन येथे चुकून आठ एमके-82 हे बॉम्ब डागले. हवाई दलाकडून ही माहिती देण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

‘वायुसेनेच्या केएफ-16 विमानातून आठ एमके-82 कमी तीव्रतेचे बॉम्ब चुकून डागले, हे बॉम्ब नियुक्त केलेल्या फायरिंग रेंजच्या बाहेर पडले’, असे हवाई दलाने म्हटले आहे.

सकाळी 10:00 वाजता ही दुर्घटना घडली. हवाई दलाने एका निवेदनात सात नागरिक जखमी झाल्याची कबुली देत खेद व्यक्त केला आहे. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान या घटनेची चौकशी करण्यासाठी लष्कराने एक समिती स्थापन केली आहे आणि जखमींना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

ही घटना हवाई दल आणि लष्कराच्या संयुक्त लाईव्ह-फायर प्रशिक्षण ऑपरेशन दरम्यान घडली.

योनहाप न्यूज एजन्सीच्या मते, हा सराव पोचेओनमधील दक्षिण कोरिया-अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावाचा भाग होता.