हिंदुस्थानचा ‘आरपार चौकार’, दक्षिण कोरियाचा 3-1 गोलफरकाने पराभव

सुस्साट सुटलेल्या गतविजेत्या हिंदुस्थानने विजयाचा आरपार ‘चौकार’ ठोकत ‘आशियाई हॉकी अजिंक्यपद करंडक’ स्पर्धेतील आपली घोडदौड सुरूच ठेवली. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानने उपांत्यपूर्व लढतीत दक्षिण कोरियाचाही 3-1 गोलफरकाने धुक्वा उडविला. याआधी झालेल्या तिन्ही लढतीतही हिंदुस्थानने चीन, जपान आणि मलेशिया यांची धुळधाण उडवली होती.

आज हरमनप्रीत सिंगने (9 व्या व 43 व्या मिनिटाला) दोन गोल करीत कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. अरिजितसिंग हुंदलने आठव्या मिनिटाला एक गोल केला. दक्षिण कोरियाकडून जी हुन यांगने 30 व्या मिनिटाला आपल्या संघासाठीचा एकमेव गोल केला. हिंदुस्थानने यजमान चीनचा पराभव करीत आपल्या अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर जपान आणि मलेशियाचा धुक्वा उडवून उपांत्य फेरी गाठली होती.

दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीतही हिंदुस्थानी संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानावर उतरला. अरिजितसिंग हुंदलने आठव्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पुढच्याच मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 2-0 ने वाढविली. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील गोलचे द्विशतकही पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो हिंदुस्थानचा तिसरा हॉकीपटू ठरला.

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये हिंदुस्थानला गोल करता आला नाही, मात्र दक्षिण कोरियाने अखेरच्या क्षणाला गोल करीत खाते उघडले. जी हुन यांगने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. मध्यंतरानंतर हरमनप्रीत सिंगने 43 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करीत हिंदुस्थानच्या आघाडीला 3-1 अशी बळकटी आणली. लढतीतील चौथ्या क्वॉर्टरमध्ये एकही गोल न झाल्याने हिंदुस्थानने 3-1 फरकाने बाजी मारली. गुणतक्त्यात हिंदुस्थान 12 गुणांसह अक्वल स्थानी आहे. आता हिंदुस्थानची 14 सप्टेंबरला पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.

हरमनप्रीतच्या गोलांचे द्विशतक

हिंदुस्थानी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 200 गोलचा आकडा पूर्ण केला. त्याने लढतीत नवव्या मिनिटाला केलेला गोल द्विशतकी ठरला. 201 गोलसह हरमनप्रीत सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या नंबरवर अर्थातच मेजर ध्यानचंद असून, त्यांनी 570 आंतरराष्ट्रीय गोल ठोकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बलबीरसिंग सीनियर असून त्यांच्या खात्यात 246 गोल आहेत. चौथ्या क्रमांकावरील के. डी. सिंग यांच्या नावावर 175 गोल असून, पाचव्या स्थानी असलेल्या धनराज पिल्ले यांच्या खात्यात 170 गोल जमा आहेत.