इंटरनेट लिंकद्वारे छावा चित्रपटाचे प्रक्षेपण, पुण्यातून एकाला अटक; दक्षिण सायबर पोलीस ठाण्याची कारवाई

छावा या हिंदी चित्रपटाच्या व्हिडिओच्या 1818 लिंक विनापरवाना इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, युटय़ुब, गुगलद्वारे प्रसारित करून मॅडॉक फिल्म व ऑगस्ट एंटरटेनमेंट कंपनीचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. या प्रकरणात तांत्रिक तपास करून दक्षिण सायबर पोलिसांनी एकाला बेडय़ा ठोकल्या. पुण्याच्या दौंड येथून 26 वर्षांच्या तरुणाला पकडण्यात आले.

14 फेब्रुवारी ते 20 मार्च यादरम्यान अज्ञात  इसमांनी छावा या हिंदी चित्रपट व्हिडिओच्या 1818 लिंक विनापरवाना इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम,  युटय़ुब, गुगलद्वारे प्रसारित केल्या होत्या. यामुळे मॅडॉक फिल्म व ऑगस्ट एंटरटेनमेंट कंपनीचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. याविरोधात ऑगस्ट इंटरटेंनमेंट कंपनीचे सीईओ रजत  हकसर यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केल्या प्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रूपाली चौधरी तसेच रेश्मा धमाळ, संतोष गलंडे व पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात पुण्याच्या सागर रांधवन (26)  याने छावा चित्रपट अपलोड करण्यासाठी होस्टिंगरकडून स्याकमुव्हीशेड डॉट टेक नावाचे डोमेन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सागरला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.