दक्षिण आफ्रिकेचा धक्का, धडक अन् धमाका; पाकिस्तानला नमवत सर्वप्रथम डब्ल्यूटीसी फायनलमध्ये

अवघ्या चार धावांत चार फलंदाज गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 4 बाद 95 वरून 8 बाद 99 अशी दुर्दशा केल्यानंतर पाकिस्तानचा विजय जवळजवळ निश्चित होता. मात्र तेव्हा कॅगिसो रबाडा आणि मार्को यान्सन यांनी नवव्या विकेटसाठी 51 धावांची अफलातून आणि अद्भुत भागी रचत पाकिस्तानच्या तोंडात असलेला विजयाचा घास हिरावून घेत त्यांना अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का दिला. या थरारक विजयामुळे दक्षिण आफ्रिका जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला संघ ठरला. या वर्षी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत उपविजयी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपला वर्षाचा शेवट खणखणीत करताना कसोटी विजय आणि डब्ल्यूटीसी फायनल असा डबल धमाका केला.

पाकिस्तानने दुसऱया डावात सऊद शकीलच्या 84 धावांच्या खेळीमुळे 237 अशी मजल मारत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 148 धावांचे आव्हान ठेवले होते. माकाx यान्सनने 52 धावांत 6 विकेट टिपत पाकिस्तानला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नव्हती. त्यातच शनिवारी दिवसअखेर मोहम्मद अब्बासने भेदक सुरुवात करताना यजमानांची 3 बाद 27 अशी अवस्था केली होती. त्यामुळे आफ्रिकेला विजयासाठी 121 धावा करायच्या होत्या. नाबाद एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बवुमाने 43 धावांची भागी रचत संघाला पन्नाशी गाठून दिली. मार्करमला खुर्रम शहझादने बाद करून आफ्रिकेला दिवसातील पहिला धक्का दिला. पुढे बवुमाने डेव्हिड बेडिंगहमसह 36 धावांची भर घातली. पण त्यानंतर मोहम्मद अब्बासने बवुमाची विकेट काढत दक्षिण आफ्रिकेला जबर धक्का दिला. पुढच्याच षटकांत नसीम शाहने कायल वेरेनची यष्टी वाकवली. मग अब्बासने बेडिंगहम आणि कॉर्बिन बॉशची सलग चेंडूवर विकेट काढत आफ्रिकेची 8 बाद 99 अशी केविलवाणी अवस्था केली. अब्बासला हॅटट्रिकची संधी होती, पण रबाडाने ती पूर्ण होऊ दिली नाही.

रबाडा-यान्सनचा झुंजार खेळ

आफ्रिका विजयापासून 49 धावा दूर होती तर पाकिस्तानला केवळ 2 विकेट हव्या होत्या. विजय पाकिस्तानच्या आवाक्यात होता. आज पाकिस्तान हिंदुस्थानच्या मदतीला धावून येणार असेच वाटत होते. पाकिस्तानच्या विजयामुळे हिंदुस्थानच्या डब्ल्यूटीसी फायनल प्रवेशाच्या शक्यता वाढणार होत्या, पण रबाडाने आपल्या फलंदाजीने सर्व कबाडा केला. त्याने यान्सनच्या साथीने न डगमगता 8 चौकारांची बरसात करत पाकिस्तानच्या विजयाच्या आशांना भिजवून टाकले.

हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य पाकिस्तानच्या गोलंदाजीवर

हिंदुस्थानला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आज दक्षिण आफ्रिकेचा पराभव गरजेचा होता. पाकिस्तानी गोलंदाजांची कामगिरी पाहाता दक्षिण आफ्रिका पराभवाच्या उंबरठ्यावर होती. एमसीजीचा खेळ संपल्यानंतर हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या नजरा सेंच्युरीयन कसोटीकडे वळल्या होत्या. पाकिस्तानने 99 वर आफ्रिकेचे 8 फलंदाज बाद केले तेव्हा हिंदुस्थानी चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण पुढे जसजसा रबाडा-यान्सनने पाकिस्तानी गोलंदाजांना चौकार ठोकायला सुरुवात केली तेव्हा हिंदुस्थानींची धाकधुक वाढू लागली आणि अखेर रबाडाने चौकार अब्बासला चौकार लगावला तेव्हा तमाम हिंदुस्थानींचा हृदयाचा ठोका चुकला. या चौकारामुळे दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचलीय आणि हिंदुस्थानला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी मेलबर्न आणि सिडनी या दोन्ही कसोटी जिंकाव्या लागणार आहेत. तसेच आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची वाटही पाहावी लागणार आहे.