वेगवान गोलंदाज डेन पॅटरसन आणि कॉर्बिन बॉश यांच्या भेदक माऱयापुढे पाकिस्तानचा पहिला डाव 211 धावांतच आटोपल्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींची धाकधुक वाढली आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध केवळ एक विजयही पुरेसा आहे आणि त्यांनी पहिल्या दिवसअखेर 3 बाद 882 अशी मजल मारत त्या दिशेने पावले टाकली आहेत. टेम्बा बवुमाने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजी देण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी ठरला. आफ्रिकेच्या पॅटरसन आणि बॉशच्या अचूक माऱ्यापुढे पाकच्या कामरान गुलामचा अपवाद वगळता एकाचाही निभाव लागला नाही. दोघांनी मिळून 124 धावांत 9 विकेट घेत पाकिस्तानचा डाव 211 वर संपवला. पाककडून गुलाम आणि मोहम्मद रिझवान (27) यांनी पाचव्या विकेटसाठी 81 धावांची डावातील सर्वात मोठी भागी केली. तसेच आमीर जमाल आणि सलमान आगाने यांनी केलेल्या 45 धावांच्या भागीमुळे पाकिस्तानला धावांचे द्विशतक गाठता आले. पहिलीच कसोटी खेळत असलेल्या बॉशने 63 धावांत 4 तर पॅटरसनने 61 धावांत 5 विकेट टिपल्या. त्यानंतर पाकिस्ताननेही भन्नाट सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेच्या तीन आघाडीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. एकटय़ा एडन मार्करमने 47 धावांची नाबाद खेळी केल्यामुळे दिवसअखेर आफ्रिका 3 बाद 82 अशा स्थितीत आहे.