धावांच्या डोंगरासह कसोटीवर आफ्रिकेची पकड, तीन फलंदाजांनी ठोकली शतके

पहिली कसोटी जिंकणाऱया दक्षिण आफ्रिकेने दुसऱया कसोटीवरही दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली. ट्रिस्टन स्टब्जपाठोपाठ आज टॉनी डे झॉर्झी आणि विआन मुल्डरनेही शतक झळकावत 6 बाद 575 धावांपर्यंत संघाला पोहोचविले. त्यानंतर कर्णधार एडन मार्करमने डाव घोषित करत यजमान बांगलादेशची 4 बाद 38 अशी घसरगुंडी उडवत दुसरा दिवस गाजवला.

मंगळवारी 2 बाद 307 अशा जबरदस्त स्थितीत असलेल्या दक्षिण आफ्रिकन डावाला झॉर्झीने आणखी बळकट केले. त्याने डेव्हिड बेडिंगहमसह 116 धावांची भागी रचत संघाला पहिल्या सत्रातच चारशे समीप नेले. मंगळवारी झॉर्झी आणि स्टब्जने दुसऱया विकेटसाठी 201 धावांची खणखणीत भागी रचली होती तर आज विआन मुल्डर आणि सेनुरन मुथुसामीने सातव्या विकेटसाठी 152 धावांची भागी केली आणि संघाला 575 धावांचा डोंगर उभारून दिला.

आज झॉर्झीने 177 धावांची झुंजार खेळी करताना 4 षटकारांसह 12 चौकारही लगावले. बेडिंगहमनेही आपल्या 59 धावांच्या खेळीत चार षटकार ठोकले. झॉर्झी बाद होताच रायन रिकलटन आणि कायल वेरेन हे दोघेही लवकर बाद झाल्यामुळे आफ्रिकेची 6 बाद 423 अशी स्थिती होती. एकवेळ दक्षिण आफ्रिका 2 बाद 386 अशा स्थितीत होता आणि मग त्यांनी झटपट 4 विकेट गमावले.

झटपट चार विकेट गेल्यानंतर डावाची सूत्रे वियान मुल्डरने हाती घेतली आणि चार षटकारांची आतषबाजी करत आपले कसोटी कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक पूर्ण केले. मुल्डरच्या जोडीने सेनुरून मुथुसामीने चौथ्याच कसोटीत आपली सर्वोच्च खेळी साकारली.

बॅटला चेंडू न लागताच 10 धावा

कसोटी इतिहासात एकाही संघाला पहिल्या चेंडूवर दहा धावा काढता आल्या नव्हत्या. मात्र आज बांगलादेशने पहिल्याच चेंडूवर 10 धावा काढण्याचा पराक्रम केला. आज बांगलादेश मैदानात फलंदाजीला उतरली तेव्हा त्यांना पाच पेनल्टी धावा मिळाल्या होत्या. कारण आफ्रिकेचा फलंदाज सेनुरन मुथुसामी फलंदाजी करताना खेळपट्टीवर धावला होता. त्याला दंड म्हणून पहिल्याच चेंडूवर पाच धावांची नोंद बांगलादेशच्या धावसंख्येत झाली होती. पॅगिसो रबाडाचा हा पहिला चेंडू शादमनने सोडून दिला होता आणि त्यानंतर दुसरा चेंडू तो असा वाइड फेकला की तो थेट सीमापार केला. पंचांनी या वाइड चेंडूवर पाच धावा दिल्यामुळे बॅटच्या संपका&त चेंडू न येताच बांगलादेशच्या विक्रमी 10 धावा झाल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेची पहिलीच वेळ

आज आफ्रिकेच्या एकाच वेळी तीन-तीन फलंदाजांनी शतके ठोकत आशिया खंडातील आपली सर्वोच्च कामगिरी केली. याआधी दक्षिण आफ्रिकेला एकदाही आशिया खंडात अशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच आपल्या डावात 17 षटकारांची आतषबाजी करत कसोटी कारकीर्दीत एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. कसोटी इतिहासात एका डावात सर्वाधिक 22 षटकार न्यूझीलंडने ठोकलेत, त्यापाठोपाठ हिंदुस्थानने 18 आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 17 षटकार ठोकले होते. आता आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाची बरोबरी साधणारी कामगिरी केली.

बांगलादेश लाज राखणार की…

पहिली कसोटी गमावून बांगलादेशने गेल्या महिनाभरात सलग तीन पराभवांची झळ सोसली. आता पहिल्या डावात नऊ षटकांच्या गोलंदाजीत शादमन इस्लाम (0), महमुदुल हसन जॉय (10), झाकीर हसन (2) आणि हसन महमूद (3) यांच्या विकेट गमावल्यामुळे बांगलादेशची 4 बाद 38 अशी केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आहेच. त्याचबरोबर बांगलादेशचा खेळ पाहाता ते ही कसोटी डावाने गमावतील, असे संकेत आतापासून मिळू लागले आहेत.