दक्षिण आफ्रिकेचे एकच लक्ष्य ः डब्ल्यूटीसी फायनल; पाकिस्तानविरुद्ध आजपासून कसोटी

यजमान दक्षिण आफ्रिका व पाहुणा पाकिस्तान या तुल्यबळ संघांमध्ये उद्यापासून दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेस प्रारंभ होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या हिंदुस्थानच्या दारुण पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीच्या शर्यतीत आलेल्या दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी मालिका जिंकून आपले स्थान पक्के करणे हेच एकमेव ध्येयसमोर ठेवले आहे. या दोन कसोटीतील एक विजयही यजमान संघाला ‘डब्ल्यूटीसी’ची फायनल गाठण्यासाठी पुरेसा ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने आम्ही पाकिस्तानविरुद्धची ही कसोटी मालिका 2-0 फरकाने जिंकू असा निर्धार व्यक्त केला. आमच्यावर अपेक्षांचा दबाव असेलच, पण आम्ही सांघिक खेळाच्या जोरावर पाकिस्तानला धूळ चारू, असा विश्वासही बावुमाने व्यक्त केला. दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघात चार वेगवान गोलंदाजाचा ताफा ठेवला आहे. 140 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा कॉर्बिन बॉश आपल्या होमग्राऊंडवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी आतूर झाला आहे. कॅगिसो रबाडा, मार्को जान्सेन यांच्यासह डेन पीटरसन व बॉश ही चौकडी वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. गेल्या 16 वर्षांत सेंच्युरियनच्या उसळत्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला बघायला मिळालेला असून, 227 बळी वेगवान गोलंदाजांनी, तर केवळ 16 बळी फिरकी गोलंदाजांनी टिपलेले आहेत. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला वन डे मालिकेत 3-0 फरकाने लोळवले होते. त्यामुळे कसोटी मालिकेत पुनरागमन करणे दक्षिण आफ्रिकेसाठी वाटते तितके सोपे नक्कीच नसेल.

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत खेळलेल्या 15 पैकी केवळ 2 कसोटी सामने जिंकलेले असून, 12 गमावलेले आहेत. मात्र, हा झाला इतिहास. यावेळी वन डे मालिकेतील निर्भेळ यशामुळे पाकिस्तानी खेळाडूंचेही मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना दोन तुल्यबळ संघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळणार आहे.