‘पुष्पा-2’च्या प्रीमिअर शोदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आज सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक केली. अटकेपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला असून यात अल्लूचा ‘झुकेगा नहीं साला’ स्वॅग पाहायला मिळाला. पोलीस अटक करायला घरी आले असताना अल्लू आरामात कॉफीचा घोट घेत उभा होता. त्यानंतर पत्नीला किस करत तो स्वतःहून पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. दरम्यान, अल्लूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली व सायंकाळी 5 वाजता तो अंतरिम जामिनावर सुटला.
‘पुष्पा-2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रीमिअर शो आयोजित केला होता. स्क्रिनिंग दरम्यान अल्लूला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबियांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरच्या मालकाविरोधात तक्रार दाखल केली. अल्लूने उपस्थितीबद्दल पूर्वकल्पना न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तक्रार मागे घेण्याची तयारी तक्रारदाराने दाखवली आहे.