सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’चे शूटिंग सुरू, मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला ‘मुहूर्त’

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सूरज चव्हाण याच्या पहिल्यावहिल्या ‘झापूक झुपूक’ चित्रपटाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्यात चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणसोबत चित्रपट करण्याची घोषणा केली होती.

केदार शिंदे यांनी त्या वेळी चित्रपटाच्या नावाची घोषणाही करून टाकली होती. दिलेल्या शब्दाला जागत केदार शिंदे यांनी अवघ्या तीन महिन्यांत या चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त अखेर पार पडला आहे. तसेच या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील याची माहितीसुद्धा समोर आली आहे. अभिनेत्री दीपाली पानसरे हिने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘झापूक झुपूक’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत दीपालीने म्हटले की, जे ठरवलं होतं ते सत्यात उतरलं. मी गेल्या काही दिवसांपासून केदार शिंदे यांच्यासोबत काम करण्याची वाट पाहत होते. अखेर तो क्षण आला. केदार शिंदे आणि बेला शिंदे तुमचे खूप खूप धन्यवाद. ‘झापूक झुपूक’ टीमला शुभेच्छा!

चित्रपटात कोणकोणते कलाकार

या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील हेसुद्धा यानिमित्ताने समोर आले आहे. सूरज चव्हाण याच्यासोबत ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ या मालिकेतील मुख्य अभिनेता इंद्रनील कामत व हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे हे सर्वजण चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचा मुहूर्त पार पडला असला तरी या चित्रपटाच्या तारखेबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे.