सध्या देशातील वातावरण आपल्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला मिळालेला पाठिंबा आणि लोकांची आपल्याला जपायची आहे. ते कायम ठेवण्यासाठी काम करावं लागणार. महाराष्ट्रासह चार राज्यांत होणार्या विधानसभा निवडणुकांचे निकाल देशाचे राजकारण बदलतील, असा विश्वास काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.
जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. यावेळी उपस्थित काँग्रेस खासदारांना सोनिया गांधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. ‘या चार राज्यांत चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात निश्चितच मोठा बदल दिसून येईल, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
जग फिरतात, पण मणिपूरला जात नाही
मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत आहेत, पण मणिपूरला जाऊन तेथील परिस्थिती सामान्य करण्यासाठी पुढाकार घेण्यास ते नकार देत असल्याचे दिसत असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.