
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) नावाखाली भारतीय शिक्षण व्यवस्थेचे झपाट्याने केंद्रीकरण, व्यावसायिकीकरण आणि जातियीकरण केले जात असल्याची कठोर टीका करत काँग्रेस नेत्या आणि खासदार सोनिया गांधी यांनी मोदी सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर तोफ डागली. भारतीय शिक्षण व्यवस्थेची हत्या थांबविण्याचे आवाहन त्यांनी मोदी सरकारला केले आहे.
‘हिंदू’ या इंग्रजी दैनिकात संपादकीय पानावर भूमिका मांडत त्यांनी गेल्या दशकातील शिक्षणविषयक धोरणाचा आढावा घेत मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेला तीन ‘सी’ची म्हणजे सेंट्रलायझेशन, कमर्शिअलायझेशन आणि कम्युनलायझेशनची बाधा झाल्याची टीका त्यांनी केली. शिक्षणावरील खर्च वाढविण्याऐवजी आउटसोर्सिंग करून शिक्षण खासगी क्षेत्राच्या दावणीला बांधले गेले. तर पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम आणि शिक्षण संस्थांमध्ये जातियीकरणाला खतपाणी घालणारे बदल करण्यावर सरकारचा भर राहिला, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.
मोदी सरकारच्या अनियंत्रित अशा केंद्रीकरणामुळे शिक्षणाच्या मूळ हेतूलाच बाधा पोहोचली आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना केंद्राने राज्यांना विश्वासात घेतलेले नाही. केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांचा समावेश असलेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची तर 2019पासून बैठकच झालेली नाही. शिक्षण हक्क कायद्याचे संरक्षण करण्याकरिता वर्षानुवर्षे मोठा निधी केंद्र सरकार राज्यांना देत आले आहे. परंतु आता पीएमश्रीचा निधी रोखून केंद्र सरकार राज्यांवर दबाव आणू पाहते आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. कुलगुरू नेमणुकीच्या राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या यूजीसीच्या येऊ घातलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांवरही त्यांनी टीकेची झोड उठवली.
एनसीईआरटीईच्या पुस्तकांमधून महात्मा गांधींच्या खुनाचा आणि मुघलांचा इतिहास वगळून विद्यार्थ्यांमध्ये परस्परांविषयी तिरस्काराची भावना वाढीला कशी लागेल यावर केंद्राचा भर आहे. त्यासाठी महत्त्वाच्या पदांवर विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा भरणा केला जात आहे, अशी टीका करत त्यांनी केंद्राला धारेवर धरले आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षणाच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे 2014पासून तब्बल 90 हजार सरकारी शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. सरकारने उच्चशिक्षण संस्थांच्या निधीला कात्री लावल्याने विद्यापीठांना कर्ज घेऊन खर्च भागवावे लागत आहेत. शेवटी हा खर्च शिक्षण शुल्काच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडूनच वसूल केला जात असल्याची टीका त्यांनी केली.