
अंगात रोमांच उभा करणारा शिवरायांचा पोवाडा… डॉ. आंबेडकरांचे कर्तृत्व सांगणारं ‘माझ्या भीमाचं योगदानं लाल दिव्याच्या गाडीला…’, महाराष्ट्राचे अभिमान सांगणारे ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या गीतांनी त्यांच्यात वेगळाच जोश आला होता… मग ‘झिंग झिंग झिंगाट…’, ‘एकवीरा आई…’ अशा गाण्यांनी त्यांना थिरकावले… सोबतीला ‘शिर्डीवाले साईबाबा’ या कव्वालीने माहोलच करून टाकला. एकापेक्षा एक सदाबहार आणि देशभक्तिपर गीतांनी भायखळा कारागृहात जबरदस्त वातावरण तयार केले होते. सर्व कैदी महिलांनी सादर झालेल्या प्रत्येक गाण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
गुन्हा केल्यामुळे कारागृहात जाण्याची वेळ येते, पण कारागृहात गेलं म्हणजे आयुष्याला खीळ बसली असे नसते. त्या चार भिंतींच्या आत झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त करून पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य जगण्यासाठी सज्ज व्हायचे असते. याच पार्श्वभूमीवर भायखळय़ाच्या महिला कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे…’ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
कैद्यांमध्ये नकारात्मकता येऊन त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू नये. त्यांच्यात देशप्रेम, बंधुभाव जागृत करण्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. कारागृहातील सर्व महिला कैद्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हिंदी, मराठी व देशभक्तिपर गीतांचा आनंद लुटला. यावेळी अधीक्षक विकास रजनलवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप चव्हाण, तुरुंगाधिकारी अमृता दशवंत आदी अधिकारी उपस्थित होते.
कैद्यांना विरंगुळा मिळावा, गाण्यांच्या माध्यमातून त्यांना आनंद लुटता यावा यासाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिला कैद्यांनी प्रत्येक गाण्याला भरभरून दाद दिली. त्यांनीही गायकांच्या सुरात सुर मिसळला, जागेवरच ठेका धरत नृत्य केले. विकास रजनलवार, अधीक्षक (भायखळा महिला कारागृह)