प्रख्यात संशोधक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यासह 150 जणांना दिल्लीच्या सीमेजवळ अटक!

चीनने गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानचा मोठा भूभाग गिळला असून भूमिपुत्र गुराख्यांना या जागेत जाण्यापासून चिनी सैनिक अडवत आहेत. या गंभीर गोष्टीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून देशापासून सत्यही लपवल्याचा आरोप करणारे प्रख्यात संशोधक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यासह 150 जणांना दिल्ली पोलिसांनी सिंधू सीमेवरून अटक केली आहे.

सोनम वांगचुक यांची ‘दिल्ली चलो पदयात्रा’ हरियाणातून दिल्लीत दाखल होण्याआधीच पोलिसांना त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना अटक केली. वांगचुक यांच्यासह काही आंदोलकांना नरेला इंटस्ट्रीयल एरिया पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत त्यांना अटक करण्यात आली असून आंदोलकांना वेगवेगळ्या पोलीस स्थानकात ठेवण्यात आले आहे.

सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक स्वयंसेवकांनी चलो पदयात्रेला प्रारंभ केला होता. लडाखच्या मागण्यांसंदर्भात केंद्राला थांबलेला संवाद पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यासाठी हे सर्व येथून राष्ट्रीय राजधानीपर्यंत पायी निघाले होते. जवळपास 700 किलोमीटरची ही पदयात्रा होती. राज्याचा दर्जा, संविधानाच्या सहाव्या अनुसूचीचा विस्तार, लडाखसाठी लोकसेवा आयोगासह भरती प्रक्रिया आणि लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र लोकसभेच्या जागा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता. गांधी जयंतीला ही पदयात्रा दिल्लीत पोहोचणार होती.

हे वाचा – चिनी ड्रॅगनने हिंदुस्थानचा भूभाग गिळला; केंद्र सरकारचे दुर्लक्ष, देशापासून सत्य लपवले

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करत याचा निषेध केला आहे. सोनम वांगचुक यांच्यासह लडाखच्या 150 नागरिकांना मोदींच्या दिल्ली पोलिसांनी सीमेवरून अटक केली आहे. हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते आणि लडाखहून दिल्ली पदयात्रा करत आले होते. हक्क आणि संविधानाच्या रक्षणासाठी त्यांना फक्त महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जायचे होते, असे श्रीनेत यांनी नमूद केले.

हे वाचा – लडाखमधील पर्वत विकण्याचा डाव, सोनम वांगचुक यांचा गंभीर आरोप

ना शेतकरी दिल्लीत येऊ शकतात, ना लडाखचे लोकं, ना तरुण. दिल्ली कुणाच्या बापाची आहे का? जनतेला कोण रोखू शकते? असा सवाल करत एक भ्याड हुकुमशहाला हे समजू शकत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.