
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झालं. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांसोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होती.
‘या नाट्यमहोत्सवाचा भाग होता आल्याचा आनंद नक्कीच आहे. मराठी नाटकाशी असलेल्या नात्याचा मला अभिमान आहेच. इतरत्र काम करताना मराठी नाटकाच्या समृद्ध वारसाकडे आदराने पाहिले जाते, तेव्हा मन खऱ्या अर्थाने सुखावते, अशी भावना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे म्हणाले की, ‘’आज एवढ्या वर्षानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेव्यतिरिक्त एवढा मोठ्या नाट्यमहोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले, हे खरंच कौतुकास्पद आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आपल्या ध्येयाच्या दिशने ज्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकते आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. जग झपाट्याने बदलत चाललं आहे. त्यासाठी नाटकाच्या माध्यमातून मराठीच्या बाहेर जाऊन बघण्याचा प्रयत्न तितक्या गांभीर्याने आजवर झाला नाही. वेगवेगळ्या भाषेच्या नाटकाच्या माध्यमातून दृष्टिकोन बदलण्याची सुरवात करता येऊ शकते. त्यासाठी अशा नाट्यमहोत्सवाची अत्यंत गरज होती, ही सुरुवात आहे.”