दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय’ च्या ‘पाकनिर्णय’ या पाककला स्पर्धा तसेच ‘लघु लघुकथा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संगीत मैफलीचे आयोजन शनिवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे करण्यात आले. यावेळी ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी 2024’चे प्रकाशनही झाले.
या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘कालनिर्णय’ने अलीकडे आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. मात्र कालनिर्णयचे सर्वसामान्यांशी शतकानुशतकांचे नाते आहे, असंच मला वाटतं, अशा शब्दांत सोनाली कुलकर्णीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘माझ्या आईबाबांकडे मराठी तर सासुबाईंकडे तमीळ कालनिर्णय असते. कालनिर्णयने कोविडचा काळ सुखकर केला. तारखांच्या मागचा मजकूर वाचनीय असतो आणि ते वाचत आम्ही मोठे झालो’, असे सोनाली कुलकर्णी म्हणाल्या. शक्ती साळगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ‘स्वरांच्या हिंदोळ्यावर’ ही मराठी भावगीतांची सांगीतिक मैफल झाली.
वाचक हा खऱया अर्थाने चालक …
z कालनिर्णय दिवाळी अंकाचे संपादक जयंत साळगावकर म्हणाले, ‘दिवाळी अंकाचे अर्थकारण आणि वाचकांची मानसिकता या दोन्ही गोष्टी झपाटय़ाने बदलत आहेत. त्याच्याशी कसे जुळवून घ्यायचे हे एक मोठे कोडे आहे. चांगला मजकूर देऊनही लोक हल्ली वाचत नाहीत. दिवाळी अंक बंद पडू नयेत म्हणून आपण या अंकांचा फॉर्म मात्र बदलायला हवा. म्हणूनच आम्ही यंदाच्या दिवाळी अंकात लघुकथा द्यायचे ठरवले.