
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यूच्या संदर्भात न्या. अचलिया कमिटी नेमली आहे. या प्रकरणी काही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे; पण सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास व्हिसेराचा अहवाल बाजूला ठेवत दोषी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील तपासात सीआयडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपास केला आहे. आरोपींनी डिलीट केलेला डेटा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधून काढला. संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणातील आरोपींना सर्वात कठोर शिक्षा होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करील, अशी ग्वाहीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एका खोलीत चालणारी नार्ंसग कॉलेज बंद
नर्सेसच्या मागणीमुळे मागील काळात आमदार-खासदारांच्या मागणीवरून नार्ंसग कॉलेज मंजूर करण्यात आली. पण यापुढे बृहत् आराखडय़ाच्या बाहेर जाऊन नार्ंसग कॉलेज मंजूर करणार नाही. एका खोलीत सुरू आहेत त्यांची तत्काळ चौकशी करून बंद करण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले.
हक्कभंग समिती ही दात नसलेला वाघ
विधिमंडळाची हक्कभंग समिती ही बिनदाताची वाघ बनली आहे अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली. एकेकाळी सभागृहाचा अवमान केला म्हणून सनदी अधिकाऱ्यालासुद्धा शिक्षा झालेली आहे. आमच्या वैयक्तिक अपमानासाठी हक्कभंगाचा वापर करू नका; पण ज्याने सभागृहाचा अवमान होतो तिथे मात्र कडक कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
गोरेंच्या बदनामी कटात राष्ट्रवादीचे नेते
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचा कट रचण्यात आला होता. या कटात संबंधित महिला आणि पत्रकार तुषार खरात हेही होते. याशिवाय गोरे यांच्या बदनामीचे व्हिडीओ तयार केल्यानंतर ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार तसेच माजी सनदी अधिकारी प्रभाकरराव देशमुख यांना पाठविले जात होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री फडणवीस यांनी करत याची चौकशी करण्याची घोषणा केली.