मला गप्प करण्यासाठी पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचे आमिष दिले! सोमनाथ सूर्यवंशीच्या भावाचा गौप्यस्फोट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण तापले असतानाच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. सोमनाथच्या मृत्यूनंतर मला गप्प करण्यासाठी पोलिसांनी 50 लाख रुपये आणि नोकरीचे आमिष दिले, असा खळबळजनक गौप्यस्फोट सोमनाथचा भाऊ प्रेमनाथने केला आहे. प्रेमनाथच्या या दाव्यामुळे पोलिसांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

परभणी दंगलीदरम्यान न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी रविवारी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. कुटुंबीयांमध्ये सोमनाथची आई विजयाबाई, भाऊ प्रेमनाथ, मावशी तेजश्री विटकर यांचा समावेश होता. यावेळी प्रेमनाथने पोलिसांकडून प्रकरण दाबण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा गौप्यस्पह्ट केला. सोमनाथच्या मृत्यूनंतर मला गप्प बसण्याचा सल्ला पोलिसांनी दिला होता. यासाठी 50 लाख रुपये आणि नोकरी देण्याचे आमिष पोलिसांनी दाखवले, असा दावा प्रेमनाथने प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीदरम्यान केला. आम्हाला प्रकाश आंबेडकर न्याय मिळवून देतील, अशी आशा त्याने व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथे जाऊन सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली होती.

परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची तोडपह्ड करून विटंबना करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबरला जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यावेळी अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली आहे.