Somnath Suryawanshi Case – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल

परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी कुटुंबीयांनी केला होता. पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला होता. मात्र आता न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल समोर आला असून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याचे यात म्हटले आहे. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युला पोलीसच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांचा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेत आयोगाने सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुन्हे), परभणी सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक यांनाही नोटीस बजावली आहे.