‘आयआयटीयन बाबा’ला चॅनेलच्या शोमध्ये घुसून बदडले

महाकुंभमेळामधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला आयआयटीयन बाबाला शुक्रवारी नोएडातील एका खासगी चॅनेलच्या शोमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आयआयटीयन बाबा ऊर्फ अभय सिंह यांना या चॅनेलने एका डिबेट शोसाठी बोलावले होते. आयआयटीयन बाबा त्या ठिकाणी पोहोचणार आहे, अशी माहिती समजल्यानंतर त्या ठिकाणी काही भगवे वस्त्रs धारण केलेले लोक स्टुडिओत घुसले. त्यांनी लाठय़ाकाठय़ांनी मारहाण केलीय, असा गंभीर आरोप अभय सिंह यांनी कॅमेऱ्यासमोर केला आहे.

मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी अभय सिंह यांनी नोएडाच्या सेक्टर 126 पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल करावा यासाठी धरणे आंदोलनसुद्धा केले, परंतु पोलिसांनी मध्यस्थी करत अभय सिंह यांची समजूत काढली. गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, परंतु मारहाणीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

कोण आहे आयआयटीयन बाबा?

आयआयटीयन बाबा ऊर्फ अभय सिंह यांनी मुंबई आयआयटीतून एअरोस्पेस इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे, असा दावा केला आहे. मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मास्टर्स ऑफ डिझायनिंग कोर्ससुद्धा केला आहे. अभय सिंह हे मूळचे हरयाणातील झज्जरचे रहिवासी आहेत. प्रसिद्धीच्या झोतात आल्यापासून आयआयटीयन बाबा सतत मीडियाला मुलाखती देत होते. यावरून महाकुंभातील आखाडय़ाच्या साधू-संतांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला होता. आयआयटीयन बाबा यांनी नुकतेच हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यासंबंधी केलेले विधानही चांगलेच गाजले होते. यावेळी हिंदुस्थान जिंकणार नाही, असे आयआयटीयन बाबांनी म्हटले होते. परंतु या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला यावरून ते सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले होते.