सरकारने संधी गमावली… आता युद्ध अटळ!
येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कुठल्या पाडणार याबाबत निर्णय घेऊ. राज्य सरकारला संधी दिली होती. मात्र त्यांनी संधीचं सोनं केलं नाही. त्यामुळे आता युद्ध अटळ असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. आंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते. जरांगे म्हणाले की, निवडणूक लढण्याची माझी इच्छा नव्हती. मात्र समाजाची होती. त्यामुळे मला त्यांचे ऐकावे लागते. आता लढणार, पाडणार आणि जिरवणार आहे. आम्ही कुठलाही पक्ष टार्गेट करत नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आरक्षण मिळू दिले नाही हे खरे आहे.
पाकिस्तानात होणार हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार
पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी पाकिस्तानी रुपये देण्यात आले आहेत. 64 वर्षांनंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. हे मंदिर 1960 पासून जर्जर अवस्थेत सापडले होते. सध्या नारोवाल जिह्यात एकही हिंदू मंदिर नाही. त्यामुळे हिंदू समाजाला धार्मिक अनुष्ठाने घरीच करावी लागतात. पाकिस्तानात आजघडीला 75 लाखांहून जास्त हिंदू राहतात.
डोनाल्ड ट्रम्प बनले कूक
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अचानक पेन्सिल्वेनियामधील मॅक्डोनाल्डच्या स्टोअरमध्ये पोहोचले. या ठिकाणी ट्रम्प यांनी टेकआऊट विंडोवर हिंदुस्थानी ग्राहकाला फ्रेंच फ्रायची ऑर्डरही स्वतःच्या हाताने दिली. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
मोठय़ा आयपीओच्या नुसत्या बडय़ा बडय़ा बाता
मोठय़ा कंपनीचा आयपीओ येणार आहे, याची मार्केटमध्ये जोरदार चर्चा केली जाते. परंतु, गेल्या काही वर्षात या बडय़ा आयपीओमुळे गुंतवणूकदारांची चांगलीच फसगत झाल्याचे उघडकीस आले आहे. अनेक मोठय़ा आयपीओंनी निराशाजनक कामगिरी केली आहे. एका अभ्यासानुसार, टॉपच्या 30 मोठय़ा आयपीओपैकी 8 आयपीओने गुंतवणूकदारांना तोटय़ात ढकलले आहे. एलआयसीचा आयपीओ मे 2022 मध्ये आला. त्यावेळी त्याची किंमत 949 रुपये होती. मात्र हा आयपीओ 867.20 वर लिस्ट झाला. आज एलआयसीच्या शेअर्सची आजची किंमत 959.85 रुपये आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएमचा शेअर वाजतगाजत आला. त्याची किंमत 2150 रुपये होती. लिस्टिंगनंतर 9 टक्के घसरण होत शेअरची किंमत 1950 रुपये इतकी झाली. आता या शेअरची किंमत 722 रुपये आहे.
शाननं गायलं भरपावसात गाणं
बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक शान मुखर्जी याने भरपावसात आपल्या चाहत्यांसाठी गोड गाणे गायले. मुंबईत शानचा एक शो आयोजित करण्यात आला होता. लाईव्ह शो सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली, परंतु पाऊस सुरू असतानाही शानने आपले गाणे सुरूच ठेवले. चाहत्यांच्या प्रेमापोटी शानने हे केले. शानच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. याचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला.
सोहेल खानची एक्स वाईफ पडली प्रेमात
अभिनेता सोहेल खानची एक्स वाईफ सीमा सजदेह पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. सोहेल खानपासून विभक्त झाल्यानंतर आपण विक्रम आहुजाला डेट करत आहोत, असे स्वतः सीमाने ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स’ या कार्यक्रमात सांगितले. सोहेल आणि सीमा सजदेह यांचे नाते 24 वर्षे टिकले. या दोघांचे 1998 साली लग्न झाले तर 2022 साली या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
कॅबमध्ये नो रोमान्स प्लीज; पोस्टर व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कशाची चर्चा होईल सांगता येत नाही. अशाच पद्धतीने तेलंगणातील कॅब ड्रायव्हरने त्याच्या कॅबमध्ये लावलेले पोस्टर चर्चेत आलंय. पोस्टरच्या माध्यमातून कॅब ड्रायव्हरने प्रेमी जोडप्यांसाठी एक खास आवाहन केलंय. त्याने कॅबमध्ये रोमान्स न करण्याचे आवाहन प्रवाशांना केलंय. पोस्टरवर लिहिलंय की, ‘कॅबमध्ये शांतपणे बसा, तुमच्यात अंतर ठेवा. ही ओयो नाही तर कॅब आहे.’ कॅबमधलं हे हटके पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. नेटकरी या फोटोवर उलटसुलट कमेंट करत आहेत.
हॉटेलात वाट पाहत बसणाऱयांसाठी 50 रुपये
‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हणतात ते उगीच नाही. पुणेकरांच्या पाटय़ा तर भन्नाट असतात, परंतु आता पुण्यातल्या एका हॉटेलचे मेन्यू कार्ड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये सहसा सर्व मेन्यूची लिस्ट असते. सर्व मेन्यू त्यामध्ये ग्राहकांसाठी दिलेले असतात, परंतु पुण्यातील मेन्यू कार्डवर हॉटेलमध्ये येऊन टाइमपास करणाऱयांसाठी वेगळा असा मेन्यू दिला आहे. अनेक जण टाइमपास करण्यासाठी हॉटेलात येऊन बसतात, अशा लोकांसाठी या हॉटेलवाल्याने एक वेगळे मेन्यू कार्ड हॉटेलात ठेवले आहे.