जगभरातून काही बातम्या…

महिलेची ‘थ्री इडियट’स्टाईलने प्रसूती

‘थ्री इडियट’ प्रमाणे मध्य प्रदेशातील सिवनी येथे एका महिलेची प्रसूती झाली आहे. जोरावाडी गावातील महिलेला प्रसूती वेदना झाल्यानंतर रुग्णवाहिका बोलावली. मात्र मुसळधार पावसामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. शासकीय रुग्णालयाच्या डॉ. मनीषा सिरसाम यांनी आशा वर्करच्या माध्यमातून गावातील प्रशिक्षित सुईणीशी संपर्क साधला आणि तिला महिलेच्या घरी पाठवले. यानंतर डॉ. मनीषा यांनी सुईणीला फोनवरून प्रसूतीची माहिती देत महिलेची सुखरूप प्रसूती केली.

स्पायडर मॅनला स्टंटबाजी भोवली

दिल्लीच्या रस्त्यांवर स्पायडर मॅनचा पोशाख घातलेला तरुण स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेटवर बसून फिरत होता. दिल्ली पोलिसांना याबाबत तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित कारवाई केली आणि स्कॉर्पिओ गाडीला व या स्पायडर मॅनला ताब्यात घेतले. स्पायडर मॅनचा पेहराव केलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव आदित्य असून तो नजफगढ येथील रहिवासी आहे. आदित्यसोबतच स्कॉर्पिओ चालक गौरव सिंह आणि दिनेश कुमार यांना अटक केली.

फक्त 3 मिनिटं टिकलं लग्न

कुवेतमध्ये एका जोडप्याचा लग्नानंतर अवघ्या 3 मिनिटांत घटस्फोट झाला आहे. आतापर्यंत सर्वात कमी काळ टिकलेले हे लग्न ठरलेय. कोर्टात लग्नाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे जोडपे बाहेर आले. वधू चालताना अडखळली अन् नवरा तिला मूर्ख म्हणाला. रागावलेल्या वधूने लगेच आतमध्ये जाऊन न्यायाधीशांकडे लग्न रद्द करण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी याला सहमती दर्शकत अवघ्या तीन मिनिटात लग्न रद्द केले.

मायक्रोसॉफ्टचे बिंग झाले ऍडवान्स

मायक्रोसॉफ्टने आपले सर्च इंजिन बिंगमध्ये ऍडवान्स एआय फिचर समाविष्ट केले आहे. बिंगमध्ये स्क्रीनच्या उजव्या बाजूला पारंपारिक सर्च रिझल्ट असतील तर डाव्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले उत्तर आणि संबंधित माहिती दिली जाईल.

निवृत्तीचे वय दहा वर्षांनी वाढणार

चीनमध्ये आता निवृत्तीचे वय दहा वर्षांनी वाढवण्याची तयारी सुरू आहे. चीनमध्ये कमी मुले जन्माला येत आहेत आणि वृद्धांची संख्या वाढतेय. त्यामुळे देशात काम करणाऱयांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने हा निर्णय घेतलाय.