वेब न्यूज – सोलो वेडिंग

जगात रोज काही ना काही नवा ट्रेंड उदयाला येत असतो आणि अनेक लोक त्याच्या प्रेमात पडून त्याला फॉलो करायला लागतात. सोशल मीडियावरचे एखादे रील्स असो, एखाद्या सुपर हिट चित्रपटाच्या गाण्यावर सेलिब्रिटीने केलेला डान्स असो, लोक ताबडतोब त्याचे अनुकरण करायला सुरुवात करतात. हे अनुकरण कधी कौतुकाचा विषय ठरते, कधी थट्टेचा, तर कधी वादाचा. सध्या जगभरातील सोशल मीडियामध्ये एक असाच ट्रेंड जोरदार चर्चेला आला आहे आणि तो म्हणजे सध्या जपान या देशात मोठय़ा प्रमाणावर चालू असलेला सोलो वेडिंगचा ट्रेंड.

लग्न आहे, थाटमाट आहे, वरात आहे, बँड आहे, सजवलेला हॉल आहे, फोटोग्राफर आहे, जेवणावळ आहे, पण नवरदेव नाही असे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले आहेत का? नसेल तर आता त्यासाठी तयार व्हा. सध्या जपानमध्ये सोलो वेडिंगचा ट्रेंड चांगला जोर पकडायला लागलेला आहे. यात वधू ही स्वतःच स्वतःशी लग्न करते. नवरदेव पण ती आणि वधू पण ती. या लग्नात सगळे विधीदेखील पारंपरिक पद्धतीने केले जातात. पाहुण्यांना निमंत्रित केले जाते. सर्व रीती पाळल्या जातात. अगदी नेहमीच्या लग्न पद्धतीने वाजतगाजत हे लग्न पार पडते.

विशेष म्हणजे सोलो वेडिंगला वाहिलेली एक प्रचंड मोठी बाजारपेठ यानिमित्ताने जपानमध्ये उदयाला येऊ लागली आहे. अनेक नामांकित कंपन्या सोलो वेडिंगला पूरक अशी उत्पादन निर्मिती करायला लागल्या आहेत. हा ट्रेंड ही कमाईची संधी आहे हे ओळखून अनेक कंपन्यांनी सोलो वेडिंग पॅकेजदेखील पुरवायला सुरुवात केली आहे. यामध्ये लग्नाच्या फोटोग्राफीपासून ते हनिमून बुकिंगपर्यंत सर्व सोयींचा समावेश आहे. जपानी महिला आता स्वावलंबी झाली असून स्वतःच्या कमाईवर आपले आयुष्य एकटीने आनंदात जगू शकते. तिला जुन्या रूढींपासून आता मुक्ती हवी आहे असा विचार या ट्रेंडला पाठिंबा देणारे करत आहेत.
■ स्पायडरमॅन