कुपवाडात 24 तासांपासून धुमश्चक्री; दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद

जम्मू- कश्मीरमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून चकमक सुरूच असून मंगळवारी  पूँछ येथे दहशतवाद्यांशी प्राणांची बाजी लावून लढताना गंभीर जखमी झालेला लष्कराचा जवान आज शहीद झाला. आज सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये कुपवाडा येथे पुन्हा धुमश्चक्री उडाली. दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबाराला लष्कराने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला. दरम्यान, 9 जूनपासून कठुआ, कुपवाडा, डोडा, राजौरी येथे दहशतवादी हल्ले सुरूच असून गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ले घटल्याचा एनडीए सरकारचा दावा सातत्याने पह्ल ठरत आहे.

कुपवाडा जिह्यातील कोवूत येथे मंगळवारी 2 ते 3 दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे येथील शोधमोहीम लष्कराने तीव्र केली. याचदरम्यान पूँछमधील एलओसीजवळील बटाल सेक्टरमध्ये मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी लष्करावर केलेल्या गोळीबारात लान्स नायक सुभाष कुमार जखमी झाले.  त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुपवाडाच्या कोवूतमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरू आहे. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया दहशतवाद्यांना मंगळवारपासूनच लष्कराच्या जवानांनी घेरलेले आहे.