
सोलापूर शहरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागात दूषित पाणी प्यायल्याने दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत असून तिसऱया मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर नागरिकांनी महापालिका आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला.
ममता म्हेत्रे (14) आणि जिया म्हेत्रे (15) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. जयश्री म्हेत्रे (13) या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. सोलापुरात 15 वर्षांपूर्वी दूषित पाण्यामुळे 21 जणांचे बळी गेले होते. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा घडली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सोलापूर महापालिकेकडून आठ दिवसांआड करण्यात येणाऱया पाणीपुरवठय़ामुळे उलटय़ा-जुलाब होऊन दोन शाळकरी मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता, जिया आणि जयश्री या तिघींनी झोपडपट्टीतील नळाद्वारे मिळालेले पाणी प्यायले होते. त्यानंतर त्यांच्या प्रपृती अचानक बिघडल्या. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ममता आणि जिया या दोघींचा मृत्यू झाला. जयश्री हिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दूषित पाणीपुरवठय़ाबाबत स्थानिक रहिवाशांनी महापालिका आणि प्रशासनावर थेट आरोप करत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगितले. अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. सोलापूरसारख्या मोठय़ा शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे शासन व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
डेंग्यूसदृश आजाराने मुलींचा मृत्यू – आयुक्त डॉ. ओंबासे
सोलापूर शहरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दोन शाळकरी मुलींचा मृत्यू हा डेंग्यूसदृश आजाराने झाल्याचा खुलासा पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केला आहे. डॉ. व्ही. एम. जी. वैद्यकीय महाविद्यालयाकडून आलेल्या प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार डेंग्यूसदृश (मेंदूज्वर) आजाराने मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली. घटानास्थळाला भेट दिल्यानंतर आयुक्तांनी ही माहिती दिली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून या परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले व वैद्यकीय पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे