
‘सोलापुरातील पूर्वभाग अपूर्व आहे,’ असे म्हटले जाते; त्याचे कारण त्या भागात प्रामुख्याने तेलगू भाषिकांची संख्या जास्त आहे. सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आंध्रातून हजारो तेलगू भाषिक कष्टकरी सोलापुरात आले आणि हैदराबाद रस्त्यावर स्थायिक झाले. ती शहराची पूर्वदिशा. त्यांनी सोलापूरची मराठी संस्कृती नुसती आत्मसात केली नाही, तर ती वाढवली. 1974 साली म्हणजे 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले ‘पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालय’ हे त्याचं प्रतीक म्हणता येईल. या मराठी वाचनालयाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि वाचकांची मातृभाषा तेलगू आहे. त्यामुळे हे मराठी वाचनालय अनोखे ठरते.
या मराठी वाचनालयात कथा, कादंबरी, नाटक, ललित लेख अशा मराठी साहित्यासह विविध विषयांवरील 35 हजार पुस्तके ग्रंथालयात आहेत. इथे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि बाल विभागातील पुस्तके वाचण्यासाठी गर्दी होत असते, हे विशेष! वाचकसंख्या घटल्याची चर्चा सगळीकडे होते. त्या पार्श्वभूमीवर तेलगू भाषिकांच्या या मराठीप्रेमाची हकिकत उत्साहवर्धक ठरते.
सोलापुरातील दिवंगत कवी लक्ष्मीनारायण बोल्ली हे तेलगू भाषिक असूनही त्यांनी मराठीमधून अनेक साहित्य प्रकाशित केले आणि मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ‘रंध्री.. रंध्री माझ्या आंध्री भाषा जरी.. मराठी नसे का आमुची मायबोली’ अशा शब्दांत मायमराठीवरही तेवढेच प्रेम केले. लक्ष्मीनारायण बोल्ली हे भाषाभगिनींच्या एकात्मतेचे खरे प्रतीक होते. सामाजिक स्थितीवर भाष्य करीत मूल्यांची घसरण दाखविणाऱ्या त्यांच्या कविता अंतर्मुख करणाऱ्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी-तेलगू भाषांना जोडणारा सेतू कोसळला आहे.
एम.एम.एम. लिब पदवीधर असलेले काशिनाथ कोळी याबाबत म्हणतात, ‘पुस्तक उपलब्ध झाली तर लोक वाचतात. आमच्या दर्गनहळ्ळी गावतल्या लहान मुलांनी पुस्तकं वाचावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे. आम्ही कन्नडमध्ये बोलतो आणि मराठी पुस्तकं वाचतो.’
पुस्तके पोहोचविण्यासाठी बैलगाडीचा वापर
आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, पूर्व विभाग वाचनालयाचे ग्रंथपाल काशिनाथ कोळी यांची मातृभाषा आहे कन्नड, त्यांचे गाव दक्षिण सोलापूर तालुक्यातलं दर्गनहळ्ळी. आपल्या गावातली छोटी मुलं आणि तरुणांमध्ये वाचनाची गोडी वाढावी म्हणून 2017च्या गुढीपाडव्यापासून गावात मराठी वाचनालय सुरू केले. स्वतःच्या मालकीची 6500 मराठी पुस्तक आबालवृद्ध गावकऱ्यांना वाचनासाठी सुपूर्द केली. वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्यासाठी कधीकधी ते कधीकधी ते चक्क बैलगाडीचा वापर करतात.