…तर मनपा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही! सोलापुरात दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सोलापूरात पावसामुळे शहरातील विविध भागातील नाले, ड्रेनेज भरून वाहत आहेत. खड्डयांत पाणी भरल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासनास अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, कारवाई झाली नाही. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. याबाबत तातडीने कारवाई केली नाही, तर मनपा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण व महानगरप्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.

शहरातील नागरिकांना महापालिकेकडून नागरी सुविधा पुरविण्यात येत नाहीत. तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेली विविध कामे निकृष्ट दर्जाची करून कोट्यवधीची बिले संबंधितांनी संगनमत करून उचलली आहेत. आज शहराच्या विविध भागांत कचरा व अस्वच्छता दिसून येत असतानादेखील, मत्तेदारास कोट्यवधीची बिले अदा केली जात आहेत. या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गळती होऊन पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याबाबत विभागीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांना परिस्थितीची माहिती असताना त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत.

शहरातील विविध भागांतील उद्यानांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. उद्यानात मोडकेतोडके बाक, मोडकळीस आलेली खेळणी, कचरा, अस्ताव्यस्त वाढलेले गवत, विविध ठिकाणी पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. याकडेही अधिकारी डोळेझाक करीत आहेत. नागरिकांचे आरोग्य पावसाळ्यात कीटकजन्य आजारामुळे बाधित होऊ नये, यासाठी विविध भागांत फवारणी, धुरळणी करण्यात यावी. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन, कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

बाळासाहेब गायकवाड, विजय पुकाळे, शिवा ढोकळे, बंटी बेळमकर, जरगिश मुल्ला, अण्णा गवळी, मीनाक्षी गवळी, वैशाली सातपुते, शुभम गवळी, संताजी भोळे, उज्ज्वल दीक्षित, अनिल दंडगुळे, रेवण बुक्कानुरे, शशिकांत बिराजदार, बाळासाहेब पवार, सुभाष सातपुते, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी उपस्थित होते.