‘अदानी’च्या वीजमीटरविरोधात शिवसैनिकांचे सोलापुरात आंदोलन, अवघ्या महिन्यात वीज बिलात पाचपट वाढ

छुप्या पद्धतीने शहरात वीज महामंडळाकडून अदानी कंपनीचे वीजमीटर बसविण्यात येत असून, याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वीज महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अदानी कंपनीचे वीजमीटर बसविताच, ग्राहकांच्या वीज बिलात पाचपटीने वाढ झाल्याचे दिसून आल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते.

सोलापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अदानी कंपनीकडून बसविण्यात येणाऱ्या वीजमीटरला तीव्र विरोध करण्यात येत आहे. वीज महामंडळाकडून छुप्या पद्धतीने ग्राहकांची दिशाभूल करत काही वीज ग्राहकांकडे अदानी कंपनीचे वीजमीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वीजदरात एक महिन्यातच अवाच्या सवा वीजदरात वाढ होऊन बिल वाढविण्यात आले आहे. ज्यांना सातशे रुपये वीज बिल येत होते, त्यांना महिन्यातच 3600 रुपयांचे वीज बिल देऊन झटका देण्यात आला आहे. त्यामुळे वीजग्राहकांत संतापाची भावना उसळली असून, वीजग्राहकांनी शिवसेनेकडे याबाबत तक्रार केली.

संतप्त शिवसैनिकांनी वीज महामंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत अदानीचे मीटर बसविण्याला विरोध केला. वाढीव बिलाची प्रत अधिकाऱ्यांच्या केबिनला लावून धिक्कार करण्यात आला. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याने नागरिकांची दिशाभूल करून अदानीचे मीटर बसविण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक कर्मचाऱ्याला ठोकल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसैनिकांचे आंदोलन आणि घोषणाबाजीने वीज महामंडळाचे कार्यालय दणाणून गेले होते.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख महेश धाराशिवकर, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, विधानसभा संघटक बाळासाहेब गायकवाड, शशिकांत बिराजदार, लहू गायकवाड, दत्ता खलाटे, उज्ज्वल दीक्षित, आबा सावंत, अण्णा गवळी, मनोज कामेगावकर, प्रकाश काशिद यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.