मारकडवाडीतून राहुल गांधी काढणार लाँग मार्च, ईव्हीएमविरोधात वणवा पेटला

राज्यात विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठा ‘झोल’ करून भाजप-महायुतीने विजय मिळविला. ईव्हीएमचा पर्दाफाश करण्यासाठी मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे म्हणून लढा उभारला. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करून मतदान रोखले. मारकडवाडीच्या लढ्याची देशभरात दखल घेण्यात आली असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच मारकडवाडीतून ‘लाँग मार्च’ काढणार आहेत. ईव्हीएमविरोधातील वणवा आता देशभर पेटणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी गावाला भेट देणार आहेत.

सोलापूर जिह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर विजयी झाले. मात्र, मारकडवाडीत जानकर यांना अत्यल्प मतदान झाले. त्यामुळे मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमविरोधात उठाव करीत 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची पूर्ण तयारी केली; परंतु सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करीत गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आणि मतदान प्रक्रिया रोखली. ईव्हीएमविरोधात सोलापूर जिह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

‘सोलापूर ईव्हीएमविरोधी कृती समिती’च्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी मारकडवाडी गावाला भेट देणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असणार आहेत.

गावाची माती राहुल यांना देणार

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, प्रा. यशपाल भिंगे, माजी आमदार रामहरी रूपनवर, नंदकुमार पवार यांनी नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांच्यासह मारकडवाडी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. ‘गावची लढाऊ माती आम्ही कपाळी लावू आणि ही माती राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करू,’ असे लोंढे यांनी सांगितले.

…तर सर्वोच्च न्यायालयात जाणार

‘ग्रामस्थांच्या लढ्याला राहुल गांधी यांची साथ असून, लवकरच ते मारकडवाडी गावात येणार आहेत. राहुल गांधी हे गावातून महाविकास आघाडीतील नेत्यांसह ‘लाँग मार्च’ काढणार आहेत,’ अशी माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिली.‘निवडणूक आयोगाने दखल न घेतल्यास आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार,’ असा इशाराही जानकर यांनी दिला.