माझं कुणीही वाकडं करू शकत नाही! मंत्री जयकुमार गोरे यांची शिरजोरी

कोणी कितीही आडवं या, कितीही दाबायचा प्रयत्न करा, कितीही काळ्या बाहुल्या बांधा. माझं कुणीही वाकडं करू शकत नाही, अशी दर्पोक्ती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. महिलेला नग्न फोटो पाठविल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या गोरे यांनी, माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलं आहे, असे सांगत शिरजोरी कायम असल्याचे दाखवून दिले.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरूद्ध एका महिलेने नग्न फोटो पाठविल्याची तक्रार करत न्यायासाठी विधानभवनासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. हे प्रकरण लावून धरणाऱया पत्रकार तुषार खरात यांना आधी अटक झाली. त्यानंतर तक्रारदार महिलेलाही खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बोलताना जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा दमबाजी केली.

देवाभाऊ माझ्या पाठीशी

माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्याविरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी काही लोक काळ्या बाहुल्या बांधत आलेत. पण त्याने काही होत नाही. आज माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे आणि माण-खटाव आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे गोरे म्हणाले.