पालकमंत्र्यांच्या बॅनरबाजीवरून भाजप पदाधिकारी-पोलिसांत राडा

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पहिल्याच दौऱ्यात डिजिटल बॅनर्स लावण्यावरून भाजप पदाधिकारी व पोलिसांत राडा झाला. पालिकेने डिजिटल बॅनर्स काढून कारवाई केलेली असताना पुन्हा त्याच ठिकाणी भव्य बॅनर्स लावत पालिकेच्या नियमांची जणू होळीच करण्यात आली. याप्रकरणी भाजपचा पदाधिकारी प्रकाश घोडके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, अवघ्या काही तासांत त्याला सोडण्यात आल्याने शहरात या ड्रामाबाजीची चर्चा रंगली आहे.

सोलापुरातील सात रस्ता परिसर आणि शासकीय विश्रामगृहासमोर महापालिकेने ‘नो डिजिटल झोन’ जाहीर केला असून, बेकायदेशीर बोर्ड लावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आज सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी भाजपचा पदाधिकारी प्रकाश घोडके याने विनापरवाना ‘नो डिजिटल झोन’ मध्ये गोरे यांच्या स्वागताचे भव्य डिजिटल बॅनर्स लावले होते. महापालिका व पोलीस पथकाने बंदोबस्तात हे डिजिटल बोर्ड काढले. त्यामुळे संतप्त झालेले भाजप पदाधिकारी व प्रकाश घोडके याने भररस्त्यात पोलिसांबरोबर वाद घालत पुन्हा डिजिटल बोर्ड लावण्याचा हट्ट धरला.

पोलिसांनी घोडकेला बंदोबस्तात पोलीस स्टेशनला आणले. मात्र, अवघ्या काही मिनिटांत चक्रे फिरल्याने घोडके याला सोडून देण्यात आले. बाहेर आल्यानंतर घोडके याने पुन्हा त्याच ठिकाणी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या आदेशाला फाट्यावर मारत तेथेच पुन्हा भव्य डिजिटल बोर्ड लावला. पालकमंत्र्यांच्या पहिल्याच दौऱ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी व कारवाईची ड्रामाबाजी शहरात चांगली रंगली आहे.

सव्वादोन तास अधिकारी ताटकळले

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पहिल्याच दौऱ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तब्बल सव्वादोन तास ताटकळत बसावे लागले. माजी पालकमंत्री देशमुख, माजी खासदार नाईक-निंबाळकर, आमदार कल्याणशेट्टी, आमदार आवताडे, माजी आमदार सातपुते यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात पालकमंत्र्यांना शासकीय अधिकाऱ्यांचा विसर पडल्याचे दिसून आले. जिल्हा नियोजन कार्यालयात बैठकीची वेळ साडेतीनची होती. मात्र, पालकमंत्री पाच वाजून 45 मिनिटांनी दाखल झाले.