अनिकेत कोथळे खून खटला प्रकरण – सांगली न्यायालयाकडून आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू

अनिकेत कोथळे खून खटलाप्रकरणी फौजदारी संहिता 313 अन्वये न्यायाधीशांकडून संशयित आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम आज सुरू झाले. ते जबाब अपूर्ण राहिल्याने उद्या (दि. 5) जिल्हा सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर पुन्हा काम होणार आहे.

या खटल्यामध्ये शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. ऍड. निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवायची होती म्हणताना त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. आता शासनाने पुन्हा त्यांची या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर राजीनाम्यानंतर ही पहिलीच सुनावणी असल्याने जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी त्यांचे वकीलपत्र सकाळीच दाखल केले होते.

खून खटल्यातील संशयित आरोपी युवराज कामटे याने 16 मे 2024 रोजी कारागृहातून जिल्हा न्यायाधीशांना पत्र लिहून ऍड. उज्ज्वल निकम हे भाजप पक्षाशी संबंधित असल्याने या खटल्यामध्ये ते पक्षपातीपणा करू शकतात. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला विरोध आहे, असे म्हटले होते. हा मुद्दा आज सुनावणीच्या सुरुवातीलाच कामटेचे वकील ऍड. विकास शिरगावकर यांनी मांडला. त्यावर तो अर्ज फाईल केला असून, जिल्हा सरकारी वकील आणि वकीलपत्र दाखल केले असल्याचे म्हणत न्यायाधीशांनी सुनावणीचे कामकाज पुढे सुरू ठेवले.

या खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने पुरावा देण्याचे काम संपले आहे. या टप्प्यामध्ये संशयित आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले जाते. तसेच न्यायालय एक प्रश्न विचारतात व त्याची उत्तरे सर्व संशयितांकडून घेतली जातात आणि ते जबाब नोंदवले जातात. या खटल्यामध्ये अंदाजे 1300 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आज ही प्रक्रिया सुरू झाली. सुमारे 200 प्रश्नांची उत्तरे संशयितांकडून घेतली गेली.

 याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद आहे, तर संशयित अरुण टोणे न्यायालयीन कोठडीत असताना मयत झाले आहेत.