मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने सोलापुरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातावर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ऋषिकेश शहाजी भोसले असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया तरुणाचे नाव असून, तो पुळूज येथील राहणारा आहे.
पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे राहणारा ऋषिकेश भोसले हा पंढरपूर येथून सोलापुरात चालत आला होता. एस. टी. स्टॅण्डजवळील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून हातावर चाकूने सपासप वार करत आत्महत्येचा प्रयत्न करत असताना काहीजणांनी पाहून त्याला रोखले. सकल मराठा समाजाचे समन्वयक विजय पोखरकर यांना ही माहिती मिळताच त्याला रोखले व उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
ऋषिकेश भोसले याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. आई-वडील, बहीण, लहान भाऊ असून, तो शिक्षण घेत आहे. मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळाले नाही. आरक्षणामुळे मराठा समाजाची वाताहात होत असून, मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावेळी मराठा समाजाचे राजन जाधव यांच्यासह अनेक अधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात आले असताना पंढरपुरातील तरुणाने आरक्षणासाठी सोलापुरात चालत येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.