
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होत आहे. या निवडणूकात 18 जागांसाठी तब्बल 479 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज एकाच दिवशी 270 उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. या निवडणुकीत उमेदवारापेक्षा सूचक, अनुमोदकांचे नशीब उघडले आहे.
राज्यात आघाडीवर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. 18 जागा असून 479 उमेदवारांनी पाच दिवसांत अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी तब्बल 270 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक अर्ज सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात दाखल झाले आहेत. सहकार क्षेत्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांची या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.
मतदारसंघनिहाय दाखल उमेदवारी अर्ज
सहकारी संस्था सर्वसाधारण 151, सहकारी संस्था महिला राखीव 31, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय 26, सहकारी संस्था विमुक्त जाती, भटक्या जमाती 37, ग्रामपंचायत सर्वसाधारण 108, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती 33, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक 20, व्यापारी प्रतिनिधी 56, हमाल-तोलार प्रतिनिधी 17, दाखल अर्जाची छाननी 1 एप्रिल रोजी होणार असून 2 ते 16 एप्रिलदरम्यान अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.
सूचक, अनुमोदकांचे नशीब उघडले
यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या उदंड झाल्याने उमेदवारांना सूचक-अनुमोदक शोधण्याची वेळ आली आहे. अनेकांना उमेदवारी अर्जावर सूचक-अनुमोदक मिळणे दुरापास्त झाले असून, आर्थिक साटेलोटे करत अर्जावर सह्या घेतल्या आहेत. इच्छुकांची गरज ओळखून पाच ते दहा हजारांची बोली लावत आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या दोन दशकांतील ही निवडणूक रंगतदार ठरत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सुभाष देशमुख या भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.