![aeroplane-general-image](https://www.saamana.com/wp-content/uploads/2017/08/AEROPLANE-GENERAL-IMAGE-696x447.jpg)
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ऐरणीवर आलेली सोलापूरची विमानसेवा अद्यापही सुरू झालेली नाही. यासाठी आणखीन तीन महिने वाट पाहण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे. विमानसेवेबाबत अधिकारी व विमानसेवा कंपन्यांची मंगळवारी बैठक झाली. राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने 30 जानेवारी रोजी सोलापूर-मुंबई, सोलापूर-गोवा मार्गासाठी निविदा जाहीर केली आहे.
सोलापुरात विमानतळाची सुविधा असूनही विमानसेवा सुरू नसल्याने अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विमान सेवेवरून सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप होत असताना, पंतप्रधान मोदी यांनी विमानतळ उद्घाटनाचा घाट घातला. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डिसेंबरमध्ये विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा केली. परंतु अद्यापही विमानसेवा सुरू नसल्याने सोलापूरकर विमानसेवेबाबत गमतीची भाषा करीत आहेत.
यापूर्वी सोलापूर-मुंबई व सोलापूर-गोवाकरिता 42 सीटरच्या एअर क्राफ्ट विमानसेवेला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) परवागी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने विमानसेवेसाठी 30 जानेवारी रोजी निविदा प्रसिद्ध केली; परंतु काही विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी आक्षेप घेत 42 ऐवजी 72 एअरक्रॉप्ट विमानसेवेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. याबाबत अधिकारी आणि विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होऊन अधिकाऱ्यांनी 72 एअरक्रॉफ्ट विमानसेवा अनुकुलता दर्शविल्याचे सांगण्यात येते. 15 मार्चपर्यंत निविदेची अंतिम मुदत असून, त्यानंतर लिलाव होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये सुरू होणारी विमानसेवा मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे सोलापूरची विमानसेवा आणखीन तीन महिने हवेत राहणार असल्याची चर्चा रंगली आहे.