आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीतील अतिक्रमणांवर ‘हातोडा’

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने पंढरीत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात नगरपालिका इमारत ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, तसेच संत गजानन महाराज मठ परिसरातील अतिक्रमणे जेसीबी लावून हटविण्यात आली. या कारवाईमुळे नेहमी अतिक्रमणात दाटलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. या कारवाईचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे.

आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. आषाढी यात्रेला 15 ते 18 लाख भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी असणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेने आज सकाळी पोलीस बंदोबस्तात प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. नगरपालिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच गजानन महाराज मठ परिसर येथे अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, डीवायएसपी अर्जुन भोसले, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी, जेसीबी आणि टेम्पोसह रस्त्यावर उतरून अतिक्रमणावर कारवाई करत होते.

नगरपालिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरील व्यापाऱयांनी दुकानांपुढे पाणसळ लावले होते. पत्रे उभे करून दुकाने, टपऱया वाढवल्या होत्या. व्यापाऱयांनी लोखंडी शटरदेखील बाहेर काढली होती. या व्यापाऱयांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, व्यापाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज प्रशासनाने कारवाई करत अतिक्रमण हटविले. शहरातील सर्वच भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

आजच्या अतिक्रमण हटाव कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, राजकीय आशीर्वादाने शहरातील प्रत्येक प्रमुख मार्गावर अतिक्रमण करून शेकडो खोके, टपऱया आणि कार्यालये सुरू आहेत. यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवावे, अशी मागणी नागरिक करीत होते.

शहरातील प्रमुख मार्ग तसेच प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते. आषाढी यात्रेला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकाऱयांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी अतिक्रमण काढून घ्यावे व सहकार्य करावे; अन्यथा प्रशासन कारवाई करून अतिक्रमण काढणार आहे.

– सचिन इथापे, प्रांताधिकारी तथा प्रशासक