
सोलापुरातील विमानसेवा ही राज्यातील हास्यास्पद घटना ठरत आहे. येत्या 26 मेपासून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे, तर याच्या नेमकी उलट माहिती ‘फ्लाय 91’ विमान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नैमिष जोशी यांनी दिली. अद्यापि विमानसेवेबाबत निश्चितता झालेली नाही, असे सांगत त्यांनी विमानसेवा अधांतरी असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासारखीच निवडणुकीतील जुमलेबाजी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
सोलापूरच्या विमानसेवेबाबत काही स्थानिक संघटनांनी होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत असल्याचे सांगत आंदोलन केले. दोन वर्षांपूर्वी स्थानिक राजकीय द्वेषातून विमानसेवेला अडथळा असल्याचे सांगत प्रशासनाला चिमणी पाडण्यास भाग पाडले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या विमानतळाचा उदघाटन सोहळा पार पडला. तर, केंद्रीय मंत्री मोहोळ यांना देत जुमलेबाजी केली. परंतु अद्यापि विमानसेवा सुरू होऊ शकली नाही.
विमानसेवेसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया डीसीजीए आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. याकरिता सात कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सोलापूर विमानतळावर सुविधा असताना आणि खासगी विमानासाठी हा विमानतळ खुला आहे; पण सोलापूरकरांसाठी ही विमानसेवा जणू जुमलेबाजी ठरत आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पदभार घेतल्यापासून विमानसेवा सुरू करण्यासाठी धडपडत आहेत. येत्या 26 मेपासून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे; परंतु ज्या कंपनीकडून विमानसेवा सुरू होणार आहे. ते ‘फ्लाय 91’ विमान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नैमिष जोशी यांनी विमानसेवा कधी सुरू होईल, हे अद्यापि निश्चित झालेले नाही. तिकीट बुकिंग सुरू करण्याबाबत काहीही ठरलेले नाही. वेळापत्रक अद्यापि ठरलेले नसल्याचे सांगत विमानसेवेबाबत संदिग्धता निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची घोषणा व विमान कंपनीची भूमिका म्हणजे निवडणुकीतील जुमलेबाजीची प्रचीती येत असल्याची चर्चा सोलापूरकरांत रंगली आहे.