
मुलीचे वडिलांवर अगाध प्रेम असते. याचा प्रत्यय आणून देणारी घटना पंढरपूरच्या न्यायालयात घडली. घरच्या मंडळींचा विरोध झुगारून मुलीने परजातीच्या तरुणाशी प्रेमविवाह केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या घराण्याची इज्जत गेली म्हणून तिसऱ्याच दिवशी मुलीसह जावयाचा काटा काढण्याचा डाव रचला; परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी तो पिस्तूल घेऊन एका मोटारीतून तडक निघाला होता. परंतु वाटेत रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या मोटारीत बेकायदा पिस्तूल सापडले. त्याच्यासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली. तपासादरम्यान पोटच्या मुलीने विरोध झुगारून केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे घराण्याची अब्रू गेली म्हणून संतापलेल्या वडिलांनी ‘सैराट’ होऊन आपल्या पोटच्या मुलीसह जावयाला मारण्याचा कट रचला.
अटकेनंतर वडिलांसह अन्य दोघा साथीदारांनी जामिनावर सुटण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला; परंतु वडील तुरुंगातून सुटून बाहेर आले तर मुलगी आणि जावई दोघांच्याही जीविताला धोका निर्माण होईल, असा आक्षेप सरकार पक्षाने घेतला होता. त्यामुळे तब्बल दोन वेळा त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, या खटल्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा वडिलांनी जामीन अर्ज दाखल केला असता, एव्हाना, गरोदर झालेल्या मुलीचे मन द्रवले. तिने वडिलांना माफ करण्याचे मनापासून ठरविले. जावयानेदेखील साथ दिली. त्यासाठी न्यायालयात शपथपत्र दाखल केले.
वडिलांना माफ करावे. त्यांच्यापासून मला आणि माझ्या नवऱ्याच्या जीविताला कोणताही धोका नाही. उलट, मी गरोदर असल्याने पित्याच्या आधाराची खरी गरज आहे. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे तिने शपथपत्रात नमूद केले. परिणामी, तब्बल तीन महिन्यांनंतर वडिलांची तुरुंगातून सुटका झाली. या बहुचर्चित प्रकरणात वडिलांतर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, अॅड. जयदीप माने, अॅड. सिद्धेश्वर खंडागळे, अॅड. सुहास कदम, अॅड. वैभव सुतार, अॅड. शिवप्रसाद ढोले काम पाहत आहेत.