मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर 7 तारखेला धमकीचा संदेश आला होता. मैं सिकंदर हूं… या गाण्याचा लेखक व अभिनेता सलमान खान यांच्या नावाने धमकावण्यात आले होते. पाच कोटी न दिल्यास सलमानला ठार मारले जाईल, अशी खंडणी मागण्यात आली होती. स्वतःच्याच नावाने धमकीचा संदेश पाठविणारा तो तरुण अखेर सापडला.
सोहेल पाशा (24) असे धमकीचा संदेश पाठविल्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला कर्नाटकाच्या रायचूर येथे पकडण्यात आले. पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा संदेश आल्यानंतर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मग गुन्हे शाखेने संदेश पाठविणाऱयाचा शोध सुरू केला. ज्या नंबरवरून धमकीचा संदेश आला त्या मोबाईलधारकाचा माग काढण्यात आला. तेव्हा कर्नाटकात तो नंबर वापरणारा व्यंकटेश नारायण हा व्यक्ती हाती लागला. पण तो वापरत असलेला मोबाईल साधा होता. अॅन्ड्रॉईड नसून त्यात व्हॉट्सअपदेखील नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात व्हॉट्सअप डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपीचा नंबर असल्याचे आढळले.
बाजारात केला झोल…
पोलिसांनी व्यंकटेशला या ओटीपीबाबत विचारणा केल्यावर 3 तारखेला बाजारात गेलो असता एका तरुणाने फोन करण्यासाठी मोबाईल मागितला होता. तेव्हा त्या तरुणाला मोबाईल दिला होता. दरम्यान व्यंकटेशच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप धमकी देणाऱयाने आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करून घेतल्याचे पुढे तपासात समोर आले.
स्वतःच्याच नावाने स्वतःला धमकी
सोहेल पाशा हाच ‘मैं सिंकदर हूं…’ या गाण्याचा लेखक आहे. त्याने पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा संदेश पाठवला त्यात मैं सिपंदर हूं… या गाण्याचा उल्लेख करत या गाण्याचा लेखक आणि सलमानच्या नावे धमकी दिली होती. शिवाय सलमानने पाच कोटी न दिल्यास त्याला ठार मारू असा खंडणीचा उल्लेख केला होता. वरळी पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत.