>> कल्पना राणे
सिनेमाच्या पडद्यामागे असलेले तंत्रज्ञानाचे जग खूप मोठे आहे. तिथे असतो नावीन्याचा ध्यास आणि प्रयोगशील वृत्ती, त्याचबरोबर परिघाबाहेरच्या संकल्पनांचा शोध घेणारी संशोधकाची नजर! नेमक्या याच गुणांमुळे केमिकल इंजिनीअर असणाऱ्या उज्ज्वल निरगुडकरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्स (एसएमपीटीई) या जागतिक संस्थेच्या हिंदुस्थानी विभागाचे अध्यक्ष, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे तांत्रिक सल्लागार आणि ऑस्कर अकादमीचे सन्माननीय सदस्य/ज्युरी असणाऱ्या निरगुडकरांना आपल्या देशाच्या सिने उद्योगात नव्या तंत्रज्ञानाची प्रमाणके (स्टँडर्डस्) रुजवायची आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद…
सिनेमामधल्या नायक-नायिकांच्या कामाची नेहमी दखल घेतली जाते, पण दिग्दर्शकाने कॅमेरामनच्या नजरेतून पाहिलेला सिनेमा जसाच्या तसा तांत्रिक दर्जासह पडद्यावर उतरवणे हे एक खूप मोठे पडद्यामागचे आव्हान असते. त्यातले एडिटिंग, कलर ग्रेडिंग, साऊंड मिक्सिंग, फिल्म प्रोसेसिंगची क्वालिटी वगैरे अनेक तांत्रिक बारकाव्यांमुळे सिनेमा जास्त परिणामकारक होतो. सिनेमाच्या फिल्मच्या दर्जावर, त्यातल्या तंत्रज्ञानात झोकून देऊन काम करणारा, त्यात नवनवे प्रयोग करणारा आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवला गेलेला, अतिशय नम्र व साधेपणाने राहणारा अवलिया म्हणजे
उज्ज्वल निरगुडकर! कॅमेऱ्यामागच्या अनेक तांत्रिक बाबींवर काम करणारी आणि त्यासाठी स्टँडर्ड निर्माण करणारी संस्था ‘सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्स’ (एसएमपीटीई) हिंदुस्थानी विभागाच्या अध्यक्षपदी ते सध्या कार्यरत आहेत आणि हॉलीवूडच्या ऑस्कर अकादमीचे सन्माननीय सदस्य/ज्युरी आहेत. तसेच ते ऑस्कर अकादमीच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या जागतिक कमिटीवरही सध्या काम करत आहेत.
2019च्या ऑस्कर्स पुरस्काराच्या सोहळ्यात रेड कार्पेटवर आमंत्रण मिळवणारे ते पहिले हिंदुस्थानी तंत्रज्ञ आहेत. ते सांगतात, “लहानपणापासून मी ज्या क्षेत्रात काम करेन, त्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ओळख मिळवेन असं मनाशी ठरवलं होतं. जे गेल्या 40 वर्षांहून अधिक काळाच्या अनुभवाने, तंत्रज्ञानात केलेल्या प्रयोगाने, प्रगतीने साकार होऊ शकलं.”
एसएमपीटीई ही संस्था 1916 साली अमेरिकेत अस्तित्वात आली त्या वेळी पहिले महायुद्ध चालू होते. त्या काळात युद्ध प्रशिक्षण फिल्म्सच्या मार्फत केले जात होते. त्यात काही सुसूत्रता आणण्याच्या हेतूने अमेरिकन सरकारने पुढाकार घेऊन या संस्थेची बीजे रोवली. 1950 सालात अमेरिकेत टेलिव्हिजन आल्यावर संस्थेच्या नावात ‘टी’ समाविष्ट झाला आणि त्या संस्थेला एश्झ्ऊं हे नाव मिळाले. फिल्म, टेलिव्हिजन, ऑडिओ आणि व्हिडीओ या क्षेत्रातली तांत्रिक प्रमाणकं म्हणजेच स्टँडर्डस् तयार करणे हे या संस्थेचे मुख्य काम आहे. संपूर्ण जगात स्टँडर्ड निर्माण करणारी ही एकमेव संस्था आहे व फिल्मसाठीचे “35 एमएम” हे स्टँडर्ड याच संस्थेने आणले. 1972 साली मुंबईला दूरदर्शन सुरू झाले. त्या वेळी टीव्ही सुरू झाला की, प्रथम चार वर्तुळे असणारा चार्ट दिसायचा. तो चार्ट एसएमपीटीईने सुरू केला. तसेच कलर पामेऱयाने शूटिंग करताना किंवा टीव्ही सुरू झाल्यावर एक वेगवेगळ्या रंगांचा एक कलरबार दिसतो. तोसुद्धा याच संस्थेचे प्रमाणक आहे.
निरगुडकर म्हणाले, “1981 पासून मी ताडदेव येथील फिल्म सेंटर फिल्म प्रोसेसिंग लॅबमध्ये टेक्निकल मॅनेजर म्हणून कार्यरत असताना सिनेमा तंत्रावरील एसएमपीटीईची मासिके नियमित वाचायचो. मनात यायचं की, जगात सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री ही हिंदुस्थानात आहे, परंतु तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण इतरांवर अवलंबून का आहोत? आपणही नवीन तंत्रज्ञान का निर्माण करू शकत नाही, या भावनेतून मी संस्थेच्या जागतिक अधिवेशनात शोधनिबंध सादर करण्यासाठी 1993 साली अर्ज केला. त्याची निवड झाली आणि एसएमपीटीईच्या जागतिक कॉन्फरन्समध्ये फिल्म प्रोसेसिंगवरील नवं तंत्रज्ञान सादर करणारा मी पहिला हिंदुस्थानी ठरलो.
नंतर 2002 साली मी फिल्म प्रोसेसिंग व क्वॉलिटी कंट्रोल या विषयावर माझा तिसरा शोधनिबंध सादर केला. सादरीकरणानंतर ED ZWANVELD, MGM चे जनरल मॅनेजर आणि नॅशनल फिल्म बोर्ड ऑफ कॅनडाचे संचालक यांनी त्यांचे कौतुक करून हे तंत्रज्ञान संपूर्ण जगासाठी स्टँडर्ड व्हावं असे जाहीरपणे सांगितले. त्यांनीच त्या शोधनिबंधाचं अमेरिकन पेटंट घेण्यासाठी सुचवलं. फेब्रुवारी 2005 मध्ये याचं पेटंट मिळालं आणि फिल्म तंत्रज्ञानातील अमेरिकन पेटंट मिळविणारा मी पहिला हिंदुस्थानी ठरलो.”
फिल्मलॅब, गोरेगावमध्ये तांत्रिक संचालक असताना 2004 साली कोडॅक कंपनीच्या प्रोसेसमध्ये बदल करून एक पर्यावरणपूरक नवीन तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. त्याच्यासाठी AKZO NOBEL या डच कंपनीचे केमिकल वापरले होते. याच डच मल्टिनॅशनल कंपनीचे सीईओ आणि नेदरलँड्सचे माजी अर्थमंत्री हेन्स वायझर यांना एका भेटीत याविषयी माहिती दिली. त्यांना हे तंत्रज्ञान एवढे पसंत पडले की, त्यांनी जागतिक सल्लागार म्हणून निरगुडकरांची नियुक्ती केली आणि नंतर
कोडॅकच्या सहयोगाने हॉलीवूडमध्ये ते तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. 2004 मध्ये मुंबईत सुरू केलेले तंत्रज्ञान 2008 मध्ये हॉलीवूडमध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’च्या प्रिंट्स बनविण्यासाठी वापरले गेले. हे तंत्रज्ञान 2009 साली ‘हॉलीवूड गोज ग्रीन’ या परिषदेत निरगुडकरांनी सादर केले आणि एका मराठी तंत्रज्ञाचा हालीवूडमध्ये ओळख बनली हे देशासाठी नक्कीच भूषणावह आहे.
आज आपल्याकडे मल्टिप्लेक्ससाठी फूड, लिफ्ट, बिल्डिंग इत्यादीसाठी स्टँडर्ड आहेत. मग सिनेमाच्या प्रदर्शनासाठी का नसावीत? याच भावनेतून एश्झ्ऊं या जागतिक समितीची स्टँडर्डस् Bureau of Indian Standards च्या माध्यमातून हिंदुस्थानात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
फिल्मसोबतच निरगुडकर डिजिटल तंत्रावरही सध्या काम करत आहेत. 2020 साली ऑस्कर अकॅडमीच्या ‘सायन्स आणि टेक्नॉलॉजी कौन्सिल’वरही त्यांची नेमणूक झाली आहे. या कौन्सिलवर नेमले गेलेले ते पहिले हिंदुस्थानी असून या कौन्सिलवर वॉर्नर ब्रदर्स, पॅरामाऊंट पिक्चर्स, सोनी पिक्चर्स, वॉल्ट डिस्ने, नेटफ्लिक्स, आमेझॉन प्राईम, गुगल यांचे ज्येष्ठ व उच्चपदस्थ सदस्यही आहेत. पुढच्या दहा वर्षांत जागतिक मनोरंजनाच्या क्षेत्रात कोणते नवीन तंत्रज्ञान आणता येईल यावर या कौन्सिलमध्ये विचारविनिमय होत असतो. याच कौन्सिलमध्ये सध्या “अपाडमी डिजिटल प्रिझर्वेशन फोरम”वरही ते काम करत असून डिजिटलवर बनविलेल्या फिल्म्सचा डेटा दीर्घकाळासाठी कसा जतन करता येईल यावर सध्या काम चालू आहे. याविषयीची माहिती ऑस्करच्या https://academydigitalpreservationforum.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उज्ज्वल निरगुडकरांच्या सायन्सचा सिनेमाच्या आर्टसाठी खूप फायदा झाला आहे. जागतिक सन्मान झाले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम!