
मुंबईतील रुग्णालयांबाहेर अनेक निराधार माणसे जखमी अवस्थेत मरणपंथाला पडलेली दिसतात. नातेवाईक कुणीच नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखलही होता येत नाही. पण ज्याचे कुणीही नाही त्याचा भगवंत असतो असे म्हणतात. भाभा रुग्णालयासमोरही गेले दोन महिने जखमांनी विव्हळत पडलेल्या रिंकू दुबे या निराधाराला याची प्रचीती आली. समर्थ आश्रमातील समाजसेवकांनी त्याच्यावर केवळ उपचारच केले नाहीत तर त्याला आधार देऊन माणुसकीचे उदाहरण घालून दिले.
रिंकू दुबे याच्या पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या आणि त्यात किडे पडले होते. रोज डोळ्यासमोर दिसूनही त्याला हात लावायला कुणीही तयार नव्हते. पूनम गागत या घरकाम करणाऱ्या महिलेने त्याच्यासंदर्भात समर्थ आश्रमाचे समाजसेवक संदीप परब यांना कळवले. परब आणि त्यांचे सहकारी संपदा सुर्वे, भाईदास माळी व रूपेश गावडे यांनी तातडीने भाभा रुग्णालयाजवळ जाऊन रिंकूच्या जखमेवर स्वतः मलमपट्टी करून त्याची सुश्रूषा केली. त्यानंतर त्याला समर्थ आश्रमात दाखल केले. त्यानंतर आपल्याला नवे आयुष्यच मिळाले असा आनंद रिंकू याच्या चेहऱ्यावर उमटला.
संदीप परब यांनी आधार दिलेले हे एकच उदाहरण नसून जीवन आनंद या संस्थेच्या माध्यमातून मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि गोवा येथे निराधारांसाठी त्यांनी आश्रम उभारले असून त्यात निराधार व मानसिक रुग्णांची विनामूल्य सेवा केली जाते. ते बरे झाल्यानंतर त्यांचे कुटुंब पुनर्मिलनही घडवून आणले जाते. आतापर्यंत जीवन आनंद संस्थेने अशा 425 निराधार व मानसिक रुग्णांना नवजीवन दिले आहे.